नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) महासचिवांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे आता नवा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राम मंदिरासाठीची चळवळ ही स्वातंत्र्यसंग्रामापेक्षाही मोठी होती, असं विधान त्यांनी केलं आहे. विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस सुरेंद्र जैन (Surendra Jain) यांनी रविवारी हे विधान करुन नवा वाद ओढवून घेतला आहे. 1947 साली भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालं. पण राम मंदिरासाठीच्या चळवळीमुळे आपल्याला धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळालं. ही स्वातंत्र्य चळवळीपेक्षाही मोठी चळवळ होती, असं सुरेंद्र जैन यांनी म्हटलं आहे.
"राम मंदिरामुळे राम राज्य उभारण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि हे मंदिर जेव्हा बांधून पूर्ण होईल तेव्हा भारताचं नशीब बदलेल. सध्याचं शतक हे रामाचंच आहे. मंदिरासाठी दान करण्याची चळवळ ही संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणारी ठरली आहे. यामुळे हे सिद्ध होतं की फक्त राम या देशाला एक करू शकतो. धर्मनिरपेक्ष राजकारणाने देश दुभंगलाच आहे" असं देखील सुरेंद्र जैन यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार यांच्या 'सब के राम' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान रविवारी जैन बोलत होते.
"राम मंदिरामुळे हिंदू समाजाला आत्मसाक्षात्कार झाला"
"राम मंदिराच्या चळवळीमुळे हिंदू जागे झाले आहेत. ही चळवळ हिंदूसाठी आत्मसाक्षात्कार घडवणारी ठरली आहे" असं देखील म्हटलं आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार यांनी हिंदुत्वाची भावना क्षीण होत चालली आहे असे म्हणणाऱ्यांच्या शंकांचे उत्तर राम मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांमुळे मिळाले आहे. राम मंदिरामुळे हिंदू समाजाला आत्मसाक्षात्कार झाला आहे. याने हिंदू समाजाला जागृत केले. आंदोलन हे प्रतिक्रियेचा परिणाम नसून हिंदूंच्या बांधिलकीचा परिणाम आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.