नवी दिल्ली - लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात पासवान यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (7 ऑक्टोबर) रामविलास पासवान हे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आले होते. त्याचवेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे पासवान यांना तातडीने एस्कॉर्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रामविलास पासवान यांची बिहार विधानसभेतून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. केंद्रीय न्याय व कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांची बिहारच्या पाटणा साहिब मतदारसंघातून लोकसभेवर निवड झाल्याने त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्या जागी पासवान निवडून आले. पासवान यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता.
कांद्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. भाव वाढल्याने कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. रामविलास पासवान यांनी काही दिवसांपूर्वी सरकारकडे कांद्याचा साठा उपलब्ध आहे. नागरिकांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे लवकरच कांदा 24 रुपये किलोने मिळेल असं म्हटलं होतं. पासवान यांनी बुधवारी (25 सप्टेंबर) ट्वीट करून याबाबत माहिती दिली होती. केंद्र सरकारने त्रिपुराला 1850 टन, हरियाणाला 2000 टन आणि आंध्र प्रदेशला 960 टन कांदा तत्काळ स्वरुपात 15.59 रुपये या दराने पोहोचवला आहे. त्यामुळे ग्राहकांना 23.90 रुपये दराने कांद्याची विक्री केला जाणार आहे. तसेच दिल्ली सरकारने 28 सप्टेंबरपासून पाच दिवसांपासून प्रतिदिन 100 टन कांद्याची मागणी केली आहे. दिल्ली सरकारची ही मागणी लवकरच पूर्ण केली जाईल. तसेच ज्या राज्यांना कांद्याची जितकी गरज आहे. ती गरज केंद्र सरकारकडून पूर्ण केली जाईल, असं देखील रामविलास पासवान यांनी म्हटलं होतं.