'काँग्रेसला श्रीरामाची अॅलर्जी', रामनगर जिल्ह्याचे नाव बदलल्यामुळे राजकारण तापले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 08:50 PM2024-07-26T20:50:33+5:302024-07-26T21:01:19+5:30
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने रामनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
Ramanagara District Rename Controversy: कर्नाटक सरकारने शुक्रवारी (26 जुलै) रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून दक्षिण बंगळुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्री एच के पाटील म्हणाले की, 'आम्ही रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बंगळुरू दक्षिण करण्याचा निर्णय घेतला आहे. तिथल्या लोकांच्या मागणीवरुनच हा निर्णय घेण्यात आला आहे.'
#WATCH | Karnataka cabinet has approved to rename Ramanagara district to Bengaluru South district.
— ANI (@ANI) July 26, 2024
Union Minister and BJP MP Pralhad Joshi says, "...This shows their allergy towards Ram and Ram Mandir, even to the name of Ram. They are quite allergic. They used to do it while… pic.twitter.com/eJvJ9Dj2IR
काँग्रेस रामविरोधी- भाजपची टीका
या निर्णयानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर निशाणा साधला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, 'काँग्रेसला राम नावाची आणि राम मंदिराची अॅलर्जी आहे, त्यामुळेच त्यांनी रामनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्येत राम मंदिर बांधले जात होते, तेव्हाही तेच करत होते. आता रामनगरचे नाव बदलण्याचा निर्णय घेऊन काँग्रेसने आपण रामाच्या विरोधात असल्याचे सिद्ध केले आहे.'
'भाजप आंदोलन करणार'
जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी कोणीही केली नसल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, 'फक्त व्होट बँकेच्या राजकारणासाठी नाव बदलण्यात आले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा भाजप आंदोलन करेल. डीके शिवकुमार यांच्यावर निशाणा साधत त्यांनी म्हटले की, 'ते त्यांचा वैयक्तिक अजेंडा राबवत आहेत. त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाचे मूल्यांकन वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.'