भाजपाकडून रमणसिंह यांचेच नाव; कॉँग्रेसमध्ये होईल चढाओढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 06:15 AM2018-12-11T06:15:46+5:302018-12-11T06:16:19+5:30
छत्तीसगडच्या निकालांबाबत एक्झिट पोलने संभ्रम वाढविला असला तरी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मात्र जागोजागी चर्चा रंगल्या आहेत.
- योगेश पांडे
रायपूर : छत्तीसगडच्या निकालांबाबत एक्झिट पोलने संभ्रम वाढविला असला तरी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मात्र जागोजागी चर्चा रंगल्या आहेत. भाजपातर्फे विद्यमान मुख्यमंत्री डॉ.रमण सिंह यांचेच नाव निश्चित आहे. मात्र कॉंग्रेसने बहुमताचा आकडा पार केला तर मात्र येथील अंतर्गत गटबाजीला ऊत येणार असल्याचेच चित्र येत आहे.
कॉंग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष भूपेश बाघेल, पक्ष प्रभारी पी.एल.पुनिया, माजी प्रदेशाध्यक्ष चरणदास महंत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते टी.एस.सिंहदेव, माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांच्यावर होती. काँग्रेसच्या अ. भा. ओबीसी सेलचे प्रमुख ताम्रध्वज साहू यांच्याकडेही मोठी जबाबदारी देण्यात आली होती. जनतेमध्ये भाजपाविरोधात असलेल्या असंतोषाचा फायदा घेण्याऐवजी सुरुवातीला काँग्रेसचे नेते वर्चस्वाच्या लढाईतच गुंतलेले दिसून आले होते. राज्य पातळीवर प्रदेशाध्यक्ष भूपेश बाघेल, केंद्रीय सरचिटणीस व राज्य प्रभारी पी.एल.पुनिया यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग होण्याची शक्यता आहे. काही नेत्यांनी आतापासूनच उमेदवारांशी विशेष संपर्क सुरू केला आहे.
रिसॉर्ट पॉलिटिक्स रंगणार
जनतेचा एकूण मूड व एक्झिट पोलचे निष्कर्ष लक्षात घेत भाजपा व काँग्रेस यांच्या विजयी जागांमध्ये फारसे अंतर असण्याचीच शक्यता कमी आहे. बहुमताचा आकडा ४५ जागांचा असून त्याच्या आसपासच दोन्ही पक्षांच्या जागा असतील. त्यामुळे निर्वाचित आमदार फुटू नये यासाठी दोन्ही पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित आमदारांना एखाद्या रिसॉर्टमध्ये ठेवले जाईल, असे दिसते. काँग्रेसने तसे ठरवलेच आहे.