नवी दिल्ली : जागतिक ख्यातीचे नामवंत इतिहासकार प्रा. रामचंद्र गुहा हे देशद्रोही, शहरी नक्षली व हिंदूविरोधी आहेत, असा आरोप करून, त्यांना अहमदाबाद विद्यापीठात नियुक्ती दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या रा. स्व. संघ परिवारातील संघटनेने दिल्यानंतर आपण विद्यापीठात रुजू होणार नसल्याचे प्रा. गुहा यांनी जाहीर केले आहे.अहमदाबाद विद्यापीठाने १६ आॅक्टोबर मानवता व गांधी विंटर स्कूलच्या संचालकपदी प्रा. गुहा यांची नेमणूक करीत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर १९ आॅक्टोबर रोजी अभाविपने त्यांच्या नियुक्तीला आक्षेप घेताना ते डाव्या विचारांचे, देशद्रोही, अर्बन नक्षलवादी व हिंदूविरोधी असल्याचा आरोप केला. त्यांची नियुक्ती केल्यास विद्यापीठातील वातावरण बिघडेल, असे सांगून ते आल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशाराही अभाविपने दिला.रामचंद्र गुहा १ फेब्रुवारी रोजी संचालकपदाची सूत्रे हाती घेणार होते. त्यासंदर्भात विद्यापीठ व गुहा यांच्यात चर्चाही झाली होती; पण गुहा यांच्या येण्याने अहमदाबाद विद्यापीठात जेएनयूसारखी राष्ट्रविरोधी स्थिती निर्माण होईल आणि ती आपण होऊ देणार नाही, असे अभाविपने बजावले.गांधींच्या विचारांचे चैतन्य पसरो‘अहमदाबाद विद्यापीठातील सध्याची स्थिती आपल्या नियंत्रणबाहेरील आहे. त्यामुळे मी तिथे रुजू होऊ शकणार नाही. मात्र, अहमदाबाद विद्यापीठाला उत्तम प्राध्यापक व कुलगुरू लाभले आहेत. महात्मा गांधी यांची जन्मभूमी असलेल्या गुजरातमध्ये त्यांच्या विचारांचे चैतन्य पसरो हीच इच्छा,’ असे गुहा यांनी म्हटले.
अहमदाबाद विद्यापीठात रुजू न होण्याचा रामचंद्र गुहा यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 5:44 AM