अभिलाष खांडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क
भोपाळ :मध्य प्रदेश सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. केशवराव हेडगेवार आणि आणखी एक नेते दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन व कार्य राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भगवान राम यांच्यावरील विषय कला शाखेच्या (बीए) विद्यार्थ्यांना शिकवण्याची तयारी केली आहे.
उच्च आणि वैद्यकीय शिक्षणातील अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या बदलांबद्दल झालेल्या टीकेला बाजूस सारून सरकारने आता १६ व्या शतकात कवी तुलसीदास यांनी लिहिलेले महाकाव्य ‘रामचरितमानस’ विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव म्हणाले की, “पदवीच्या विद्यार्थ्यांना सरकार सक्ती करीत नाही. परंतु, वैकल्पिक विषय म्हणून हिंदू देवतेचे जीवन व कार्य यांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करीत आहे.”
संघाची स्थापना के. ब. हेडगेवार यांनी केली असून २०२५ मध्ये संघ १०० वर्षांचा होईल. काँग्रेस आणि इतर पक्षांनी भाजप सरकारवर हेडगेवार व उपाध्याय यांच्या कार्याचा समावेश शिक्षणात केल्याबद्दल टीका केली आहे.