Ramdas Athawale Eknath Shinde News: "महाराष्ट्रातील वाद लवकर संपला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष खूप चांगलं काम केलं आहे. आताही त्यांनी ५७ जागा निवडून आणल्या आहेत. भाजपच्या १३२ जागा निवडून आल्या आहेत. भाजपचे म्हणणे असे आहे की, एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत. आणि आता देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली पाहिजे", अशी भूमिका मांडत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्यासाठी नवा तोडगा सुचवला.
दिल्लीत माध्यमांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, "देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं, असं भाजपच्या वरिष्ठांनी निश्चित केलं आहे. एकनाथ शिंदे थोडे नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याची गरज आहे. त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आहे. लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा परिणाम महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्रातील यशात एकनाथ शिंदेंची मोठी भूमिका राहिली आहे", असे भाष्य रामदास आठवलेंनी केली.
फडणवीसांनी चार पावलं मागे घेतली, आता शिंदेंनी...
"आता भाजपकडे इतक्या जागा आहेत की, ते तयार होणार नाहीत. एकनाथ शिंदेंनी आता दोन पावलं मागे घ्यायला हवीत, जसं देवेंद्र फडणवीस यांनी चार पावले मागे आले होते. त्यांनी (देवेंद्र फडणवीस) त्यांच्या (एकनाथ शिंदे) नेतृत्वाखाली काम केलं", असा सल्ला रामदास आठवलेंनी एकनाथ शिंदेंना दिला.
"एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं. उपमुख्यमंत्री होणं, त्यांना योग्य वाटत नसेल, तर त्यांनी केंद्रात मंत्री व्हावे, असा माझा त्यांना सल्ला आहे. याचा मोदीजी, अमित शाहाजी याचा विचार करतील. पटकन निर्णय व्हायला हवा. नाराजी चांगली नाहीये", असे रामदास आठवले लांबलेल्या निर्णयावर म्हणाले.
आरपीआयला मंत्रीपद देण्याचे वचन -रामदास आठवले
"एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ५७ आमदारांची आम्हाला गरज आहे. महायुती म्हणून आम्ही पुढे गेलं पाहिजे. नाहीतर जनतेचा विश्वास उडेल. जनतेनं विश्वास ठेवला आहे. त्यामुळे लवकर तडजोडी केल्या पाहिजेत. लवकर मंत्रिमंडळ विस्तार व्हायला हवा. पण, त्या मंत्रिमंडळात माझ्या पक्षालाही मंत्रिपद मिळायला हवे. मी ही मागणी आधीही केली होती. मी देवेंद्र फडणवीसांना दोन वेळा भेटलो आहे. आरपीआयला मंत्रिपद देण्याचे वचन दिले गेले आहे", असे रामदास आठवले म्हणाले.