नवी दिल्ली - फर्ड्या इंग्लिशसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यात काल मजेशीर ट्विट वॉर रंगले. एकीकडे शशी थरूर यांनी लोकसभेतील एक फोटो शेअर करून रामदास आठवलेंचा उल्लेख केला. तर काही वेळाने रामदास आठवलेंनी पलटवार करत शशी थरूर यांची शाळा घेतली. तसेच थरूर यांना इंग्रजी स्पेलिंग योग्य लिहिण्याचा सल्ला दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या शशी थरूर यांना इंग्रजीवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाते. तसेच त्यांच्या इंग्रजीसमोर भलेभले निरुत्तर होतात, मात्र यावेळी रामदास आठवलेंनी इंग्रजीवरून थरूर यांची कोंडी केली.
शशी थरूर यांनी गुरुवारी लोकसभेतील एक फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन ह्या अर्थसंकल्पाबाबतच्या प्रश्नांना उत्तरं देताना दिसत आहेत. तर त्यात दिसत असलेले रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरील भावांवरून थरूर यांनी अर्थसंकल्पावर निशाणा साधला. ते म्हणाले की, सुमारे दोन तासांच्या ‘Bydget debate’ वर अवलंबून राहिल्यानंतरही रामदास आठवलेंच्या चेहऱ्यावरील स्तब्ध आणि अविश्वसनीय भाव सांगतात की, ट्रेजरी बेंचसुद्धा वित्तमंत्र्यांकडून अर्थव्यवस्था आणि अर्थसंकल्पाबाबत केलेल्या दाव्यांवर विश्वास ठेवू शकत नाही आहेत.
त्यानंतर रामदास आठवले यांनीही शशी थरूर यांना उत्तर दिले आणि त्यांना चुकीचा लिहिलेला Bydget शब्द सुधारण्याचा सल्ला दिला. त्यांनी लिहिले की, प्रिय शशी थरूर जी विनाकारण दावे आणि विधाने करताना चुका होणं साहजिक आहेत. मात्र ही जुगलबंदी इथेच थांबली नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना नंतर शशी थरूर यांनीही उत्तर देत आपली चूक मान्य केली. त्यांनी सांगितले की, टायपिंगमधील चुकीमुळे असे झाले. त्यांनी सांगितले की, चुकीचे टायपिंग हे वाईट इंग्रजीपेक्षा मोठे पाप आहे.