"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 07:29 PM2024-05-08T19:29:30+5:302024-05-08T19:30:20+5:30
Ramdas Athawale reaction on Sam Pitroda controversial statement: वर्णभेदी टिप्पणी करणाऱ्या सॅम पित्रोदांवर सर्वच स्तरातून टीकेचा भडीमार
Ramdas Athawale reaction on Sam Pitroda controversial statement: पूर्व भारतातील लोक चीनी लोकांसारखे, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे, उत्तरेकडील लोक गोरे तर दक्षिण भारतीय लोक आफ्रिकन लोकांसारखे दिसतात, असे विधान करत काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. पित्रोदा हे बहुतांश वेळा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत आहेत. आता त्यांनी देशातील नागरिकांच्या रंग आणि दिसण्यावरुन वक्तव्य करत नवा वाद ओढवून घेतला आहे. पित्रोदा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून पित्रोदांवर जोरदार टीका केली जात आहे. भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी त्यांचा समाचार घेतल्यानंतर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही पित्रोदांना शाब्दिक चपराक लगावली आहे.
"सॅम पित्रोदा हे कुठल्या वर्णाचे आहेत हे आधी बघावे लागेल. साऊथच्या लोकांना आफ्रिकन म्हणणे योग्य नाही. उलट आफ्रिकन लोकांना साऊथचे म्हणणे ठीक राहिल. नॉर्थचे लोक चीनी लोकांसारखे दिसतात असे बोलणे देखील अयोग्यच आहे. भारतात विविध वेषांचे, वर्णाचे लोक एकत्रितपणे राहतात. त्याचा भारतीयांना अभिमान आहे. पण वादग्रस्त विधाने करणे हा सॅम पित्रोदांचा स्वभाव आहे. असा भेदभाव करणे हा भारताचा अपमान आहे. त्यामुळे ओव्हरसीज विभागाचे जे प्रमुखपद पित्रोदांना दिले आहे, ते त्यांच्याकडून काढून घ्यावं आणि काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करावी," अशी रोखठोक भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मांडली.
#WATCH | On Sam Pitroda's statement, MoS Social Justice and Empowerment, Ramdas Athawale says, "It is not right to say that the people of South look like Africans & people from Northeast look like people from China...Congress party should take action against him. He should be… pic.twitter.com/LIJl0GpqYn
— ANI (@ANI) May 8, 2024
सॅम पित्रोदा नक्की काय म्हणाले?
ईशान्य भारतातील लोक चिनी लोकांसारखे दिसतात. दक्षिण भारतीय हे आफ्रिकन लोकांसारखे आहेत आणि उत्तर भारतीय काहीसे गोरे आहेत. आतापर्यंत जशी विविधतेत एकता आहे, तशीच ती आपण टिकवून ठेवू शकतो. गेल्या ७५ वर्षात प्रत्येकाला जगता येईल असे चांगले वातावरण आपण निर्माण केले आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेवू शकतो. पूर्व भारतातील लोक चीनसारखे दिसतात. पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक गोरे दिसतात आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. पण काही फरक पडत नाही. आपण सर्व बंधुभावाने राहतो," असे विधान सॅम पित्रोदा यांनी केल्याने वाद निर्माण झाला.
स्मृती इराणींनी केली पित्रोदांवर टीका
"काँग्रेस पार्टी धर्म आणि जातीच्या नावावर इतके वर्षे राजकारण करत होती. आता त्यांच्यातील आणखी वाईट मानसिकता समोर आली आहे. या देशात कोण कुठल्या वर्णाचा आहे, कोण कुठल्या विभागाचा आहे या आधारावर भारतीयांमध्ये भेद करत आहे. आज काँग्रेसचे सॅम पित्रोदा यांनी जे विधान केलं, ते अतिशय निंदनीय आहे. यातून राहुल गांधी आणि गांधी परिवार देशाप्रति काय विचारसरणी बाळगतात त्याचे हे उदाहरण आहे," अशा शब्दांत स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदा यांच्या विधानाचा समाचार घेतला.