नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात असलेले समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी गोरखपूर आणि फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकत्र आले. मायावती आणि अखिलेश यादव यांच्या आघाडीमुळे भाजपासह त्यांचे इतर मित्रपक्षही चिंतेत दिसत आहेत. अशातच, गरज पडल्यास भाजपाची सत्ता आणण्यासाठी मायावती यांच्यासोबत बोलणी करण्यास तयार आहे, असे केंद्र सरकारमधील मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले आहे. जर केंद्रात सरकार स्थापन करायचं असेल तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा मिळवणं आवश्यक आहे.
2014 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला 80 पैकी 71 जागांवर विजय मिळला होता. मात्र, सपा आणि बसपा यांनी हातमिळवणी केल्यानं उत्तर प्रदेशातील मतांचं गणित बदललं आहे आणि दोन्ही पार्टीची व्होटबँक भाजपावर भारी होताना दिसत आहे. सपा-बसपा एकत्र आल्याचे परिणाम गोरखपूर आणि फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पाहायलाही मिळाले. दरम्यान, सपा-बसपाची आघाडी अतुट असून 2019पर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा खुद्द मायावती यांनी केली आहे. मात्र, सपा-बसपाची आघाडी होऊ नये, यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. मात्र, या प्रयत्नात भाजपाला म्हणावे तसं यश येताना दिसत नाहीय. भाजपाच्या पराभवासाठी आघाडी आवश्यकगोरखपूर, फुलपूर, अरारिया, जेहानाबाद येथील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्याने विरोधी पक्षांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अखिलेश यादव, मायावती, तेजस्वी यादव, मिसा भारती, ममता बॅनर्जी, दोन्ही डावे पक्ष तसेच काँग्रेसचे नेते यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याची भावना पुन्हा व्यक्त केली आहे. 14 मार्चला निकाल लागण्याच्या चोवीस तास आधी सोनिया गांधी यांच्या घरी आयोजिलेल्या मेजवानीत 19 पक्ष सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये बसपा व सपा एकत्र आल्यानंतर लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये जे निकाल लागले ते पाहता सारे विरोधक एकत्र आल्यास मोदी सरकारचा विजयरथ रोखता येईल, असा आत्मविश्वास त्यांच्यात आला आहे.फुलपूर व गोरखपूर येथील लोकसभा पोटनिवडणुकांत काँग्रेस पराभूत झाली असली तरी या पराजयातही काँग्रेसचा एकप्रकारे विजयच झाला आहे. या दोन्ही मतदारसंघात सपा-बसपाच्या आघाडीच्या उमेदवारांविरोधात काँग्रेसने आपले उमेदवार विचारपूर्वक मैदानात उतरविले होते. भाजपा उमेदवाराची मते काँग्रेसच्या उमेदवाराने काही प्रमाणात घेतल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदा सपा-बसपाला मिळाला.
केंद्रात सत्तेत असलेला पक्ष पोटनिवडणुकांत शक्यतो जिंकतो. पण 2016-17 या काळातील पोटनिवडणुकांत भाजपा पराभूतच होत आला आहे. अमृतसर, श्रीनगर, गुरुदासपूर, अजमेर, अलवर, फुलपूर, गोरखपूर, अरारिया येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल हेच सांगतात. सपा व बसपाचा 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. पण फुलपूर, गोरखपूर पोटनिवडणुकांच्या निकालांनी विरोधी पक्षांमध्ये नवे बळ संचारले आहे.