जयपूर - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ''अयोध्येमध्ये राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी बौद्ध मंदिर होते. यानंतर मुस्लिम आणि हिंदूंनी बौद्ध मंदिर पाडून तेथे राम मंदिर आणि बाबरी मशीद बांधली'', असे विधान आठवले केले आहे. जयपूर येथील पिंक सिटी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांसोबत बोलताना रामदास आठवले यांनी हे विधान केले आहे. या जागेवर खोदकाम केले तर तेथे बौद्ध मंदिराचे अवशेष सापडू शकतात, असेही आठवले म्हणाले. दरम्यान, 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 300 हून अधिक जागा मिळतील, अशी भविष्यवाणीही त्यांनी यावेळेस केली आहे.
मला तर पेट्रोल-डिझेल मोफत मिळतं - आठवलेएकीकडे दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असताना, महागाईची झळच बसत नसल्याचे विधान आठवले यांनी केले आहे. ''पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काय आहेत, याने काहीही फरक पडत नाही. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते. माझं मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसू शकेल'', असे वक्तव्य रामदास आठवले यांनी शनिवारी जयपूर येथे केले. ''पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे जनता होरपळतेय, ही बाबदेखील मान्य आहे. इंधनाच्या वाढणाऱ्या किमती कमी करणं, हे सरकारचं कर्तव्य आहे'',असेही यावेळेस आठवले यांनी म्हटले. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. अशातच ''पेट्रोल-डिझेल मोफत मिळतं असल्यानं महागाईची झळ बसतच नाही'', असे विधान रामदास आठवले यांनी करुन सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याची टीका होऊ लागली आहे.