नवी दिल्ली : खाद्यपदार्थ, औषधी आणि सौंदर्य प्रसाधने या क्षेत्रात धमाका केल्यानंतर, योगगुरू रामदेव बाबा यांची कंपनी पतंजली आयुर्वेद लिमिटेड आता ब्रँडेड कपड्यांच्या क्षेत्रात उतरणार आहे. पतंजलीचा कपड्यांचा ब्रँडही विदेशी कंपन्यांच्या ब्रँडला टक्कर देणार आहे.कंपनीचे प्रवक्ते एस. के. तिजरावाला म्हणाले की, ‘पतंजली आपला स्वदेशी कापड्यांचा ब्रँड बाजारात उतरविण्याच्या तयारीत आहे. सर्वांसाठीचे कपडे एप्रिलपर्यंत बाजारात येतील. पहिल्या वर्षी ५ हजार कोटींची विक्री होईल, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.’सर्व प्रकारच्या श्रेणीतील कपडे पतंजली बाजारात आणणार आहे. अभिजनांसाठी उच्च दर्जाचे कपडे त्यात असतील, तसेच जनसामान्यांसाठी स्वस्त कपडेही असतील. मागावरील कपडे, विणकाम केलेले, तसेच यंत्राद्वारे तयार करण्यात आलेले डेनिमसारखे कपडे यांचा त्यात समावेश असेल. पतंजलीच्या स्वदेशी अजेंड्याला अनुसरून ब्रँडनेम ठरविण्यावर सध्या कंपनी विचार मंथन करीत आहे. ‘परिधान’ या नावावरही विचार सुरू आहे.एप्रिल २०१८ पर्यंत देशातील २५० खास पतंजली स्टोअर्समधून हे कपडे उपलब्ध करून देण्यात येतील. पतंजलीच्या व्यापक नेटवर्कप्रमाणेच अन्य स्टोअर्समधूनही हे कपडे उपलब्ध करून देण्यात येतील. किशोर बियाणी यांच्या फ्युचर समूहाच्या बिग बाजारचा त्यात समावेश आहे, असे तिजरावाला म्हणाले. आॅक्टोबर २०१५ मध्ये फ्युचर रिटेलने पतंजलीसोबत भागीदारी करार केला होता. पतंजलीच्या उत्पादनांचा प्रसार, वितरण आणि विपणन करण्यास फ्युचर रिटेल त्यानुसार बांधील आहे. फ्युचरची देशभरात २४३ शहरांत स्टोअर्स आहेत.
रामदेव बाबा यांचा आता कपड्यांचाही ब्रँड येतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 12:28 AM