मुंबई- योगगुरू रामदेव बाबा यांनी बुधवारी पतंजलीचं नवं मेसेजिंग अॅप लॉन्च केलं आहे. Kimbho (किंभो) असं या मेसेजिंग अॅपचं नाव आहे. पतंजलीचं हे अॅप व्हॉट्सअॅप मेसेजिंगअॅपला टक्कर देईल, असा पतंजली कंपनीला विश्वास आहे. पतंजलीचे प्रवक्ते एसके तिजारावाला यांनी ट्विट करून म्हटलं की,'आता भारत बोलेल. सिमकार्डनंतर आता रामदेव बाबा यांनी Kimbho (किंभो) मेसेजिंग अॅप लॉन्च केलं आहे. आता व्हॉट्सअॅपला टक्कर दिली जाईल. आमचं स्वदेशी मेसेजिंग अॅप गूगल प्ले स्टोअरवर डाऊनलोड करता येईल, असं त्यांनी म्हटलं.
Kimbho ची टॅगलाइन 'अब भारत बोलेगा' अशी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या आधी रामदेव बाबा यांनी बीएसएनएलशी करार करून 27 मे रोजी स्वदेश समृद्धी सिमकार्ड लॉन्च केलं होतं. कर्मचाऱ्यांना स्वस्तात मोबाईल सेवेचा आनंद घेता येईल यासाठी बीएसएनएल कंपनीबरोबर मिळून हे सिमकार्ड आणण्यात आलं. बीएसएनएल-पतंजलीच्या या करारानंतर सुरूवातीला पतंजलीचे कर्मचारी आणि पदाधिकारी या सिमकार्डचा वापर करू शकतात. सिमकार्ड पूर्णपणे लॉन्च झाल्यावर सर्वसामान्यांना ते वापरता येणार आहे. सिमकार्ड खरेदी केल्यानंतर युजर्सला पतंजलीच्या वस्तूंवर 10 टक्के सवलत मिळणार आहे.
या सिमकार्डमध्ये 144 रूपयांचं रिचार्ज केल्यावर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. याशिवाय 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएसचीही सुविधा मिळेल. याशिवाय युजरला आरोग्य, अपघात आणि लाइफ इन्श्युरन्स मिळणार आहे.