मेरठ - देशातील झुंडशाही पाहून भीती वाटते असे वक्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहांवर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका केली. यातच, आता बाबा रामदेव यांनी उडी घेतली आहे. भारतात जेवढी सामाजिक सहिष्णुता आहे, तेवढी जगात कोणत्याही देशात दिसणार नाही. असे वाटत असेल तर सर्व जग फिरून बघून या, असा खोचक टोला बाबा रामदेव यांनी नसीरुद्धीन शहा यांना हाणला आहे. पतंजली परिधान शोरुमच्या उद्धघाटनासाठी बाबा रामदेव मेरठमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.
देशाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेम, आदर, सन्मान मिळाल्यावर अचानक काहीजणांना देश असुरक्षित वाटायला लागतो. अशा लोकांना गद्दारच म्हटले पाहिजे. भारतात जेवढी सामाजिक सहिष्णुता आहे, तेवढी जगात कोणत्याही देशात दिसणार नाही, असे बाबा रामदेव यांनी म्हटेल आहे. दरम्यान, नसीरुद्दीन शहा यांनी काही दिवसांपूर्वी बुलंदशहर प्रकरणावरून आपले मत मांडले होते. एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येपेक्षा गायींच्या हत्येला जास्त महत्त्व दिले जाऊ लागले आहे. विखारी विचारांचा फैलाव झाला असून, त्याला नियंत्रित करणे आता अवघड झाले आहे. कायदा हातात घेण्याची काही जणांना सूटच मिळाली आहे, असे मत नसीरुद्दीन शहा यांनी मांडले होते.
नसीरुद्दीन शहा यांच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच, परस्परविरोधी विधाने केली जाऊ लागली आहेत. दरम्यान, नसीरुद्दीन शहांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. मी पण देशभक्त आहे. पण मला गोंधळ घालण्याची गरज वाटत नाही, असे त्यांनी म्हटले. शहांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांचे विधान समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पतंजली परिधान शोरूमच्या देशभरात 500 शाखा उघडण्यात येणार असून, त्यामाध्यमातून पाच लाख लोकांना रोजगार मिळवून दिला जाईल, असा दावा यावेळी बाबा रामदेव यांनी केला आहे. देशातील कापड उद्योग सध्या मरणासन्न अवस्थेत आहे. त्यामुळे पतंजली परिधानच्या माध्यमातून त्याला नवजीवन देण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असेही यावेळी बाबा रामदेव यांनी सांगितले.