हिमाचलमध्ये भाजपाला धक्का; माजी कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा, काँग्रेसकडून निवडणूक लढवणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 04:31 PM2024-03-26T16:31:54+5:302024-03-26T16:40:07+5:30
Ramlal Markanda : हिमाचलमधील जयराम सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या रामलाल मारकंडा यांनी राजीनामा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी हिमाचल प्रदेशातभाजपाला मोठा धक्का बसला आहे. हिमाचलमधील जयराम सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या रामलाल मारकंडा यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधूनभाजपामध्ये दाखल झालेले रवी ठाकूर यांना पोटनिवडणुकीत उमेदवार बनवल्याच्या निषेधार्थ त्यांनी राजीनामा दिला आहे. रामलाल मारकंडा यांनी म्हटलं आहे की, ते काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात.
2017 मध्ये रामलाल मारकंडा हे लाहौलमधून आमदार होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवी ठाकूर यांनी त्यांचा पराभव केला. आता पोटनिवडणुकीत रवी ठाकूर हे भाजपाचे उमेदवार आहेत. रामलाल मारकंडा यांनी एनएसयूआयमधूनच राजकारणाला सुरुवात केली होती.
जयराम सरकार में कैबिनेट मंत्री रहे रामलाल मारकंडा ने बीजेपी से इस्तीफा दे दिया है. उन्होंने कांग्रेस से भाजपा में शामिल हुए रवि ठाकुर को उपचुनाव में प्रत्याशी बनाए जाने के विरोध में इस्तीफा दिया. रामलाल मारकंडा ने कहा है कि संभवत: वे कांग्रेस पार्टी से चुनाव लड़ सकते हैं. pic.twitter.com/x47Ew9CWb5
— Ankush Dobhal🇮🇳 (@DobhalAnkush) March 26, 2024
काँग्रेसचे बंडखोर नेते रवी ठाकूर यांना लाहौल-स्पीतीमधून भाजपाचे तिकीट मिळाल्याने हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत. याच दरम्यान, माजी मंत्री रामलाल मारकंडा मंगळवारी लाहौल येथे पोहोचले आणि त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह राजीनामा देण्याची घोषणा केली. मी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवू शकतो, असे मारकंडा यांनी जाहीर केलं.
हिमाचल प्रदेशात लोकसभेच्या एकूण 4 जागा आहेत. राज्यातील चारही जागांवर एकाच टप्प्यात एक जून रोजी निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे देशभरात 7 टप्प्यात मतदान होणार असून, त्यापैकी सातव्या टप्प्यातील मतदानासाठी हिमाचल प्रदेशची निवड करण्यात आली आहे. कांगडा, हमीरपूर, शिमला आणि मंडी या हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या जागा आहेत. देशभरातील लोकसभेच्या सर्व जागांसाठीचे निवडणूक निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत.