पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या भव्यदिव्य सोहळ्याला हजारो जण उपस्थित होते. संत-महंतांपासून बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली. संपूर्ण देशात उत्सव साजरा करण्यात आला. राम मंदिर सोहळ्याला उपस्थित असलेल्यांना संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधकामात सहभागी असलेल्या मजुरांचा सन्मान केला. मजुरांवर पुष्पवृष्टी केली.
अरुण योगीराज यांनी ही अतिशय सुंदर मूर्ती तयार केली आहे. मूर्तीकार अरुण योगीराज यांनी स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती असल्याचं सांगितलं आहे. "मला वाटतं की मी आता जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे. माझे पूर्वज, कुटुंबातील सदस्य आणि प्रभू राम यांचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे. कधीकधी मला असं वाटतं की मी स्वप्नांच्या जगात आहे" असं अरुण योगीराज म्हटलं आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कुबेरटीला येथे गेले. तेथे भगवान शंकराची पूजा केली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीशी निगडित मजुरांचे आभारही मानले. पंतप्रधान मोदींनी कामगारांवर पुष्पवृष्टी केली आणि या योगदानाचे कौतुक केले. प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि संबोधनानंतर पंतप्रधान मोदींनी यावेळी उपस्थित असलेल्या विशेष पाहुण्यांची भेट घेतली.
आपले रामलला आता तंबूत राहणार नाहीत; प्राणप्रतिष्ठेनंतर PM मोदी भावुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. आज आपले राम आले आहेत असं म्हणत मोदींनी भाषणाची सुरुवात केली. "22 जानेवारी 2024 चा हा सूर्य एक अद्भुत तेज घेऊन आला आहे... कॅलेंडरवर लिहिलेली ही तारीख नाही, तर नव्या काळचक्राचा उदय आहे."
"शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आज आपले राम आले आहेत. या शुभप्रसंगी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. माझा कंठ दाटून आला आहे, माझं मन अजूनही त्या क्षणात गढून गेले आहे. आमचे रामलला आता तंबूत राहणार नाहीत, आता रामलला दिव्य मंदिरात राहणार आहेत. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत. त्याग आणि तपश्चर्येनंतर आपले राम आले आहेत" असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.