नवी दिल्ली : एक लाखाहून अधिक प्रतींच्या खपाचा विक्रम करणाऱ्या २०१४च्या लोकमत ‘दीपोत्सव’च्या शिरपेचात सोमवारी उत्कृष्ट पत्रकारितेसाठीच्या रामनाथ गोएंका पुरस्काराची मौलिक भर पडली. दिल्लीत झालेल्या समारंभात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते ‘रामनाथ गोएंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नालिझम’च्या मानकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले.महानगरांपासून दूर असलेल्या, धुळीने भरलेल्या एखाद्या आदिवासी पाड्यात रस्ता आणि रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांआधी मोबाइलची रेंज पोचते, पिण्याच्या शुद्ध पाण्याआधी टीव्हीवरची गाणी पोचतात आणि वीज वाहून नेणाऱ्या खांबांआधी मोबाइल फोन चार्ज करण्यापुरत्या सौरऊर्जेच्या छत्र्या उगवतात, तेव्हा काय घडते? या एकाच प्रश्नाचा शोध घेत भारताचे चार कोपरे धुंडाळून ‘लोकमत’च्या पत्रकारांनी आणलेल्या चार कहाण्या प्रतिष्ठेच्या ‘रामनाथ गोएंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नालिझम’च्या मानकरी ठरल्या आहेत. २०१४ सालच्या दिवाळीत चर्चेचा विषय झालेल्या या अनवट प्रयत्नाचा राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरव झाला आहे.खपाचा विक्रम!गेल्या वर्षी एक लाख प्रतींच्या विक्रीचा विक्रमी टप्पा ओलांडणाऱ्या लोकमत दीपोत्सवच्या अंकाने यंदाच्या दिवाळीत तब्बल ५० टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवत 1.60 लाख प्रतींचा अभूतपूर्व खप नोंदवला आहे.- लोकमत वृत्तसमूहातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘दीपोत्सव २०१४’ या दिवाळी अंकात चार लेखकांची ‘वेट व्हाईल वी कनेक्ट’ ही विशेष शोधमालिका प्रकाशित झाली होती. रामनाथ गोएंका फाउंडेशनच्या वतीने देशभरातील मुद्रित-इलेक्ट्रॉनिक आणि आॅनलाइन माध्यमांमध्ये केल्या जाणाऱ्या प्रयोगशील पत्रकारितेचा गौरव केला जातो. २०१४च्या पुरस्कारांमध्ये ‘अनकव्हरिंग इंडिया इनव्हिजिबल’ या विभागातल्या राष्ट्रीय पुरस्काराने लोकमत दीपोत्सवचा गौरव झाला आहे.
‘दीपोत्सव’ला ‘रामनाथ गोएंका’ सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2015 3:12 AM