नवी दिल्ली : उत्तर पश्चिम दिल्लीमधून भाजपाचे खासदार असलेले उदित राज यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या 24 तासांपासून सुरु असलेल्या घडामोडींनंतर त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी भाजपावर तोंडसुख घेत त्यांना दलितांची मते हवी मात्र दलित नेता नको असा आरोप केला.
यावेळी त्यांनी भाजपाने जर तिकीट दिले असते तर त्यांच्याकडून लढलो असतो असे कबुलही केले. 2 एप्रिल 2018 मध्ये जेव्हा दलित रस्त्यांवर उतरले होते, तेव्हा मी त्यांना समर्थन दिले होते. या कारणावरून माझे तिकिट कापल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच 2014 मध्ये सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्याकडे बायोडेटा आले होते. माझ्यासाठी काहीतरी करा असे ते सांगत होते. त्यानाही निवडणुकीचे तिकिट हवे होते, मात्र दिले नाही. यावर ते शांत बसले म्हणून त्यांना राष्ट्रपती पद देण्यात आले. मी देखिल शांत बसलो असतो तर मलाही पंतप्रधान बनवले असते. मात्र, मी मुका आणि बहिरा बनून राहू शकत नाही, असा आरोपही त्यांनी केला.
यापूर्वी त्यांनी ट्विटर खात्यावर लिहिले की जर मला आधीच सांगितले असते तर एवढा ताप झाला नसता. पक्षावर अशी का वेळ आली की अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी एक वाजता उमेदवारी घोषित करण्यात आली. आधीच सांगितले असते तर एवढा त्रास झालाच नसता. भाडेकरू आहे, ऐकावेच लागेल.
लोकसभेचे तिकिट मिळत नसल्याचे पाहून नाराज झालेल्या उदित राज यांनी मै भी चौकीदार अभियानावेळी ट्विटरवरील नावापुढे चौकीदार लिहिले होते. मात्र, काल त्यांनी नावापुढील चौकीदार काढून टाकले होते. नाराजी व्यक्त होताच प्रसारमाध्यमांमध्ये बोभाटा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा नावापुढे चौकीदार लिहिले होते. भाजपाकडून आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा चौकीदार लिहिले असल्याची चर्चा होती.