नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये कलाक्षेत्रासाठी 6 कलाकारांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. तर, क्रीडा क्षेत्रातून बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक पदकविजेत्या पी.व्ही. सिंधुला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आज राजभवन येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिल्लीत उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडू यांच्याहस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. त्यानंतर, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. त्यामध्ये, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आले आहे. कंगना रणौत बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तनु वेड्स मनु, मणिकर्णिका, क्वीन हे तिचे काही गाजलेले सिनेमा. कंगनाला यंदा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. याबद्दल तिनं सरकारचे आभारही मानले.