Ramnavami : श्रीराम नवमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी झाल्यापासून राननवमीला नवचैनत्य प्राप्त झाले आहे. दरम्यान, यानिमित्ताने देशभरात सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे, विशेषत: ज्या राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून जातीय तणाव दिसून आला आहे, त्या राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. यूपी, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. गरज वाटेल तिथे, जास्तीचा फौजफाटा तैनात करुन शांतता राखण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
उत्तर प्रदेशरामनवमीनिमित्त उत्तर प्रदेशातील अयोध्या शहर विशेषत: सुरक्षेबाबत सतर्क आहे. हे प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असल्याने येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी राम मंदिराभोवती सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. अयोध्येला वेगवेगळ्या झोनमध्ये विभागण्यात आले असून, सर्व झोनमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय निमलष्करी दलही तैनात करण्यात आले आहे. सरयू नदीच्या आसपास एनडीआरएफ आणि जल पोलीस सतर्क आहेत.
राज्याच्या इतर भागातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. प्रमुख रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच सोशल मीडियावर देखरेख वाढवण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अफवा किंवा भडकाऊ कंटेट पसरवण्यापासून रोखता येईल. कोणत्याही असामाजिक घटकाने हिंसाचार करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
महाराष्ट्रराम नवमीनिमित्ताने राजधानी मुंबईत 13,500 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत, ज्यात 11,000 कॉन्स्टेबल, 2,500 अधिकारी आणि 51 सहायक पोलिस आयुक्तांचा समावेश आहे. शांतता राखण्यासाठी राज्य राखीव पोलीस दल (SRPF) आणि इतर विशेष तुकड्यांच्या नऊ तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईसह राज्यातील विविध लहान-मोठ्या शहरांमध्ये पोलिस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
रामनवमीनिमित्त पश्चिम बंगालमध्येही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोलकातामध्ये पाच मोठ्या मिरवणुकांसह 50 हून अधिक लहान मिरवणुका निघण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शहरात अतिरिक्त पाच हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. हावडा, सिलीगुडी, मालदा आणि मुर्शिदाबाद या राज्यातील विविध जिल्ह्यांतील संवेदनशील भागात विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी फ्लॅग मार्च काढून लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवली जाईल, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. गेल्या काही वर्षांपासून राज्यात रामनवमीच्या मुहूर्तावर जातीय तणावाच्या घटना उघडकीस आल्या असून, या वेळी सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
झारखंड
झारखंडमध्येही रामनवमीनिमित्त सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणत्याही समाजविघातक कारवायांना वेळीच आळा घालता यावा यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाईक रॅलीसारखी कोणतीही नवीन परंपरा बंद करा, ज्यामुळे वातावरण बिघडण्याचा धोका आहे, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिले आहेत. रामनवमीच्या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात याची काळजी राज्यातील प्रशासनाने घेतली आहे. झारखंडमध्ये पोलीस सतर्क असून सुरक्षा व्यवस्था वाढवल्याने प्रशासन या उत्सवाबाबत पूर्णपणे सतर्क असल्याचे दिसून येते.
बिहारबिहारमध्येही संपूर्ण सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राजधानीत रामनवमीनिमित्त पाटणा पोलिसांनी सुरक्षेसाठी ठोस तयारी केली आहे. उत्सवादरम्यान परिसरात 2500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या दोन कंपन्यांसह 800 अतिरिक्त फौजाही तैनात करण्यात आल्या आहेत. इतर राज्यांमध्येही कुठलाही अनिचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसह विविध सुरक्षा दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.