ईनाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव (Ramoji Rao) यांचं आज निधन झालं आहे. अनेक दिवसांपासून आजारी होते. शनिवारी पहाटे ३.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८७ वर्षांचे होते.
रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना ५ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या. तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता.
रामोजी राव यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. "रामोजी राव यांच्या निधनाने दु:ख झालं आहे. तेलुगू मीडिया आणि पत्रकारितेतील त्यांचं योगदान कौतुकास्पद आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहेत" असं जी किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे.
रामोजी राव हे एक यशस्वी उद्योजक, चित्रपट निर्माते होते. ते तेलुगू मीडियातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जातात. त्यांचं पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव होतं. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त रामोजी राव यांनी हैदराबादमध्ये रामोजी ग्रुपची स्थापना केली होती. या समूहात जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ, रामोजी फिल्म सिटी, ईटीव्ही नेटवर्क आणि चित्रपट निर्मिती कंपनी उषा किरण मुव्हीज यांचा समावेश आहे.