राफेलवरून हक्कभंगाचे अस्त्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 04:55 AM2018-07-24T04:55:01+5:302018-07-24T04:55:40+5:30
किमतीवरून दिशाभूल; काँग्रेस व भाजपा यांच्यात जुंपली
नवी दिल्ली : फ्रान्सकडून घ्यायच्या राफेल लढाऊ विमानांंच्या किमतीवरून काँग्रेस आणि भाजपा यांच्यात गेल्या आठवड्यात लोकसभेतील हक्कभंग ठरावावरील चर्चेपासून सुरू झालेले वाक्युद्ध सोमवारीही सुरूच राहिले व दोन्ही पक्षांनी परस्परांवर हक्कभंगाचे अस्त्र उगारले.
राफेल विमान खरेदी करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर ‘खोटेनाटे’ आरोप करून, सभागृहाची दिशाभूल केल्याबद्दल निशिकांत दुबे, अनुराग ठाकूर, दुष्यंत सिंग आणि प्रल्हाद जोशी या भाजपा सदस्यांनी लोकसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंग ठरावाची नोटीस दिली. प्रश्नोत्तराचा तास संपताच दुबे यांनी या नोटिशीचा विषय काढला, तेव्हा काँग्रेस सदस्यांनी आरडाओरड करून त्यास विरोध केला. ‘मला नोटीस मिळाली आहे. तिचा अभ्यास करून मी तुम्हाला कळवीन,’ असे अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी भाजपा सदस्यांना सांगितले.
भाजपाने काँग्रेसचे म्हणणे खोडून काढले
आधीच्या ‘संपुआ’ सरकारने केलेला राफेल करार मोदी सरकारने नव्याने केल्याने, त्या विमानांची किंमत चौपटीने वाढली, असा काँग्रेसचा आरोप आहे. मात्र, करारातील गोपनीयतेच्या कलमामुळे विमानांची किंमत उघड करता येणार नाही, असे संरक्षणमंत्री सीतारामन यांचे म्हणणे आहे.
अविश्वास ठरावावरील भाषणात राहुल गांधी यांनी राफेल करारात अशी गोपनीयतेची कोणतीही अट नसल्याचे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या हवाल्याने सांगून मोदी व सीतारामन दिशाभूल करीत आहेत, असा आरोप केला होता. फ्रान्स सरकारने लगेचच एक निवेदन प्रसिद्ध करून राहुल यांचे म्हणणे खोडून काढले होते.
किंमत गोपनीय ठेवण्याची अट नाही
भाजपाने राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दिली आहे. तिला काटशह देण्यासाठी काँग्रेसही हक्कभंग आणण्याच्या विचारात आहे. मात्र, तो मोदी व सीतारामन यांच्यावर आणायचा की फक्त सीतारामन यांच्यावर आणायचा, हे अद्याप ठरलेले नाही. माजी संरक्षणमंत्री ए. के. अॅन्थनी, आनंद शर्मा व रणदीप सुरजेवाला यांनी प्रवक्त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. फ्रान्ससोबत झालेल्या करारात विमानांची किंमत गोपनीय ठेवण्याची अट नाही. सरकार दिशाभूल करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला व सरकारला किंमत जाहीर करावीच लागेल, असा आग्रह धरला.