उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये आज (गुरुवारी) लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या विजयानंतर येथील जागा रिक्त झाली होती. रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचे असीम राजा आणि भाजपचे घनश्याम सिंह लोधी यांच्यात थेट लढत आहे. घनश्याम सिंह लोधी याआधी आझम खान यांचे विश्वासू मानले जात होते. मात्र, त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.
रामपूरमध्ये 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली, मात्र त्याआधीच आझम खान यांनी पोलिसांवर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, "मी रात्रभर जागे होतो. आमचे लोकसभेचे उमेदवार गंज पोलिस स्टेशन (पीएस), कोतवाली पीएस, सिव्हिल लाइन्स पीएस (रामपूरमध्ये) गेले होते. सर्वात अशोभनीय वर्तवणूक गंजच्या एसएचओची होती. हिंसाचारही केला... मतदानाची टक्केवारी कमी झाल्यास प्रशासन जबाबदार असेल. याला सरकारही जबाबदार असेल."
याचबरोबर, समाजवादी पक्षाचे नेते पुढे म्हणाले की, "शहरात सर्वत्र जीप आणि सायरन होते. त्यांनी लोकांना पोलीस स्टेशनमध्ये नेले, त्यांना मारहाण केली आणि मी काही पैशांच्या ट्रान्सफरबद्दल देखील ऐकले आहे. हे लाजीरवाणे आहे. मी गुन्हेगार आहे, मला मान्य आहे... त्यामुळे माझे शहर सुद्धा असेच मानले गेले आहे. ते त्यांना हवे ते करू शकतात, आम्हाला सहन करावे लागेल. वाट पाहायची असेल तर त्रास सहन करावा लागतो."
रामपूर समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला रामपूर लोकसभा मतदारसंघ हा समाजवादी पक्षाचा मजबूत बालेकिल्ला मानला जातो. रामपूर हे दीर्घकाळापासून आझम खान यांच्या प्रभावाचे क्षेत्र आहे आणि पक्षाने रामपूर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आझम खान यांच्याकडे सोपवली आहे. रामपूर लोकसभा मतदारसंघात 17 लाखांहून अधिक मतदार आहेत. त्यात 50 टक्के हिंदू आणि 49 टक्के मुस्लिम मतदार आहेत. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांनी भाजप उमेदवार जया प्रदा यांचा एक लाख नऊ हजार 997 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता.