रामपूरः उत्तर प्रदेशमधल्या रामपूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीनं आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिल्यानंतर तिला जिवंत जाळलं. या आगीत पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु पत्नीची परिस्थिती गंभीर असल्याचं समजल्यानंतर मुरादाबाद टीएमयूमध्ये हलवलं आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या मागणीनंतर पोलिसांनी पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.रामपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील दौंकपुरी टांडा या गावातील ही घटना आहे. खेडा टांडाचे रहिवासी असलेल्या नजाकत अली यांनी मुलगी सीमा हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी दौंकपुरी टांडातील रहिवासी मोहम्मद आरिफशी करून दिला होता. लग्नानंतर पत्नीकडून सासरची मंडळी हुंड्याची मागणी करत असल्याची आरोप करण्यात आला आहे. रविवारी सकाळी सीमाचा सासरची मंडळी आणि पतीबरोबर भांडण झालं. त्याचदरम्यान पतीनं पत्नीला तलाक, तलाक, तलाक म्हणत तिहेरी तलाक दिला आणि तिला घरातून निघून जाण्यास सांगितलं. सीमानं जेव्हा याला विरोध केला, तेव्हा तिच्यावर रॉकेल टाकून तिला पेटवून देण्यात आलं.सीमाचा आवाज ऐकून अनेक जण घटनास्थळी पोहोचले. उपस्थितांनी महिलेचा आग विझवून टाकली. तोपर्यंत विवाहिता 80 टक्के जळाली होती. शेजारील लोक पीडितेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. महिलेची परिस्थिती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवलं. सासरच्या मंडळींच्या मागणीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अजीमनगर ठाणे प्रभारी अमरीश कुमार यांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती दिली. लवकरच आरोपींना अटक होणार आहे.
तिहेरी तलाकनंतर पत्नीला रॉकेल टाकून जिवंत जाळलं, 80 टक्के भाजली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 11:21 AM