नवी दिल्ली - भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेल्या रामसेतूवरून आतापर्यंत आपल्या देशात अनेक वादविवाद झाले आहेत. देशातील हिंदुत्ववादी संघटना रामायण आणि रामचरित मानसामध्ये उल्लेख असलेला कथित रामसेतू हाच असल्याचा दावा करतो. तर विज्ञानवादी मंडळी ही केवळ कल्पना असून, असा कोणताही सेतू नसल्याचे सांगत असते. दरम्यान, दोन्ही देशांमधील पाल्कच्या सामुद्रधुनीत असलेल्या सेतूबाबत आता मोठा गौप्यस्फोट झाला आहे. दोन्ही देशांदरम्यान असलेल्या या सेतूबाबत विज्ञानविषयक कार्यक्रम तयार करणाऱ्य अमेरिकेच्या एका सायन्स चॅनेलचे शास्त्रज्ञ आणि पुरातत्व विभागाने तयार केलेला अहवाल समोर आला आहे. या चॅनेलने रामसेतूच्या अस्तित्वाविषयी पुराव्यासह दावा केला आहे. रामसेतू हा पूर्णपणे काल्पनिक नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या 30 मैल क्षेत्रावर परसलेली वाळू पूर्णपणे नैसर्गिक आहे. मात्र येथे असलेले दगड सुमारे 7 हजार वर्षे जुने असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. हिंदू धर्मग्रंथांनुसार श्रीरामांनी लंकेवर स्वारी करताना रामेश्वरम आणि श्रीलंकेच्या भूमीपर्यंत दगडांचा सेतू बांधल्याचा उल्लेख आहे. समुद्रात असलेल्या या सेतूची खोली ही 3 फुटांपासून 30 फुटांपर्यंत आहे. भारतात याला रामसेतू तर जगभरात अॅडम्स ब्रिज या नावाने ओळखले जाते. 2007 साली ही दगडांची मालिका तोडून जहाजांसाठी मार्ग बनवण्याचा घाट सरकारने घातला होता. तसेच रामसेतूबाबत काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या शपथपत्रावरून मोठा वादही झाला होता. रामसेतूबाबत शास्त्रज्ञांचा दावा - रामसेतू हा पूर्णपणे काल्पनिक नाही- हिंदू धर्मग्रंथांनुसार प्रभू श्रीरामांनी असाच सेतू बनवल्याचा उल्लेख- येथे असलेले दगड सुमारे 7 हजार वर्षे जुने - हा सेतू नैसर्गिक नाही मानवनिर्मित- रामसेतूवरील दगड प्राचीन आणि इतरांपेक्षा वेगळे- रामसेतूसाठी वापरलेले दगड दुसरीकडून आणण्यात आले असावेत
रामसेतू काल्पनिक नाही? सेतूच्या अस्तित्वाबाबत शास्त्रज्ञांनी केला मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 11:44 PM