रामविलास पासवानही महाआघाडीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 08:23 AM2018-12-21T08:23:18+5:302018-12-21T08:23:57+5:30
बिहारमध्ये एनडीएला तडे; उपेंद्र कुशवाह यांच्या पाठोपाठ भाजपाला आणखी एक धक्का?
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत बिहारमधील जागावाटपावरून झालेल्या मतभेदामुळे एनडीएतून बाहेर पडलेले राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह अखेर काँग्रेसप्रणीत यूपीएमध्ये गुरुवारी सामील झाले. जागावाटपावरून लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख रामविलास पासवान हेही नाराज असून, तेही यूपीएच्या वाटेवर जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
पासवान सध्या केंद्रात मंत्री आहेत. त्यांचे पुत्र खा. चिराग यांनी बुधवारीच राहुल गांधी हे परिपक्व नेते असल्याचे विधान केले होते. त्याआधी मंदिर हा एनडीएचा अजेंडा नसल्याचेही ते म्हणाले होते. तीन राज्यांत झालेल्या पराभवानंतर बिहारमध्येही तसे घडू शकते, असे वाटत असल्यामुळेच पासवान वेगळा विचार करीत असल्याचे सांगण्यात येते. राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर कुशवाह यांनी यूपीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी व लालूप्रसाद यादव यांनी खुल्या मनाने केलेली चर्चा हे मी यूपीएमध्ये सामील होण्यामागचे एक कारण आहे. माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात गुरुवारी एका पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. यावेळी काँग्रेस नेते अहमद पटेल, काँग्रेसचे बिहारचे प्रभारी शशिकांत गोहील, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, विरोधी पक्षनेते शरद यादव हे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकांत आरएलएसपीला यूपीएकडून बिहारमध्ये चार ते पाच जागा देण्यात येतील असे सूत्रांनी सांगितले.
हवामानतज्ज्ञ पासवान
च्लोकसभा निवडणुकांत एनडीएशी जागावाटपावरून लोकजनशक्ती पक्षाचेही मतभेद झाले आहेत. रामविलास पासवान यांचा पुत्र खा. चिराग यांनी त्यानिमित्ताने भाजपाला इशाराही दिला आहे. रामविलास पासवान हे हवामानतज्ज्ञ आहेत.
च्वारे कोणाच्या दिशेने वाहत आहेत, कोणत्या पक्षाला सत्ता मिळण्याची शक्यता आहे, याचा त्यांना बरोबर अंदाज येतो व ते मग त्या पक्षाशी युती करतात, असे लालूप्रसाद यादव यांनीही म्हटले होते. एलजेपी सामील झाल्यास यूपीएची ताकद जशी वाढेल, तशीच भाजपा, जनता दल (यू)ची डोकेदुखी दोन्ही वाढू शकेल.