ऑनलाइन लोकमत -
थुरा, दि. 04 - मथुरा हिंसाचारातील मुख्य आरोपी रामवृक्ष यादव ठार झाला असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे डीजीपी जावेद अहमद यांनी दिली आहे. जावेद अहमद यांनी ट्टिवटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. मथुरा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या काहीजणांची ओळख पटली आहे. रामवृक्ष यादवच्या साथीदारांनी मृतदेहाची ओळख पटवली असून कुटुंबाला कळवण्यात आल्याचं जावेद अहमद यांनी सांगितलं आहे. अतिक्रमणक हटवताना मथुरामध्ये झालेल्या चकमकीत 24 जणांचा मृत्यू झाला असून रामवृक्ष यादव यातील मुख्य आरोपी होता.
काय आहे घटना -
न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांचे पथक अतिक्रमणकर्त्यांना हटविण्यासाठी परिसराची पाहणी करण्यासाठी पोहोचले असता, अवैध कब्जा करणाऱ्यांनी पोलिसांवर गोळीबार आणि दगडफेक सुरू केली होती. त्यात पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि ठाणेदार संतोष यादव यांचा मृत्यू झाला होता. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी रबरी गोळ्या झाडल्या आणि लाठीमार केला. पण आंदोलनकर्त्यांनी तेथे ठेवलेले गॅस सिलिंडर आणि दारूगोळ्याला आग लावली. त्यामुळे स्फोट झाले.
या हिंसाचारात २२ दंगलखोर ठार झाले होते, यापैकी ११ जण आगीत मृत्युमुखी पडले. मृतांचा आकडा सध्या 24 वर पोहोचला आहे. घटनास्थळावरून ४७ पिस्तुले, ६ रायफल्स आणि १७८ काडतुसे ताब्यात घेण्यात आली. ३२०पेक्षा जास्त लोकांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Some of the dead in Mathura operation identified. Rambriksh Yadav's body identified by associates. Family intimated for final confirmation.— Javeed (@javeeddgpup) June 4, 2016
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच दोन मृत पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमी २३ पोलिसांना रुग्णालयात दाखल केले आहे. जवाहरबाग परिसरात सुमारे ३ हजार लोकांनी २६० एकरापेक्षा जास्त भूखंडावर दोन वर्षांपासून अवैध कब्जा केला होता. केंद्राने उत्तर प्रदेश सरकारकडून घटनेचा अहवाल मागितला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यादव यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून त्यांना संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली.
चूक झाल्याची कबुली
अतिक्रमणकर्ते आणि पोलिसांतील हिंसक संघर्ष ही प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणेची चूक असल्याची कबुली अखिलेश यादव यांनी दिली. पोलिसांना हल्लेखोरांच्या तयारीबाबत माहिती नव्हती, असे सांगून ते म्हणाले की, पोलिसांनीसंपूर्ण तयारीनिशी आणि सविस्तर माहिती मिळवून तेथे जायला पाहिजे होते. आंदोलनकर्त्यांजवळ एवढे काही असेल याची त्यांना कल्पना नव्हती.