ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. २४ - 'पाकिस्तान नरक नाही, तेथील लोकही आपल्यासारखेच आहेत. ते अत्यंत चांगली वागणूक देतात', असं वक्तव्य करणा-या अभिनेत्री आणि माजी खासदार रम्या यांना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी पाठिंबा दिला आहे.
रम्या यांनी पाकिस्तान जे काही पाहिलेले योग्य आहे. त्यांच्या व्यक्तव्यात काय चुकीचे आहे ? देशाच्या विरोधात त्या काहीही बोलल्या नाहीत, असे दिल्लीत पत्रकारांशी बोलताना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा म्हणाले.
काँग्रेस पक्षाच्या सदस्य असलेल्या रम्या सार्कतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात गेल्या होत्या. त्यानंतर भारतात आल्यावर त्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या वक्तव्याला उत्तर देत पाकिस्तान नरक नसल्याचं म्हटले होते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तान नरक असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, रम्या यांचं वक्तव्य देशद्रोही असल्याचा आरोप करत वकील के. विठ्ठल गौडा यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. तसेच, त्यांच्यावर सोशल मिडियात आणि भाजपच्या नेत्यांकडून टिका करण्यात येत आहे. मात्र कॉंग्रेसने रम्या यांच्या व्यक्तव्याला पाठिंबा दर्शवत त्यांचा बचाव केला आहे.