ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. २७ - १५ वर्षांपूर्वी चूकून पाकिस्तानात गेलेल्या गीताचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ करून तिला सुखरूपरित्या मायदेशात पाठवल्याबद्दल भारत सरकारने कराचीहून पळून आलेल्या 'मोहम्मद रमझान'ला परत पाठवून पाकिस्तानला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
१५ वर्षांपूर्वी पाकिस्तानत गेलेल्या गीता या मूकबधिर तरूणीला ईधी फांऊडेशनच्या बिल्किस ईधी यांनी दत्तक घेतले होते व ती तेव्हापासून त्यांच्याचकडे राहत होती. भारत सरकारच्या प्रयत्नानंतर गीता काल ( सोमवार) भारतात परतली. तिने पालकांना ओळखल्यानंतर पाकिस्तान सरकारनेही तिच्या कागदपत्रांची तत्काळ पूर्तता करून तिला मायदेशात परत पाठवले. सीमेवर भारत- पाकिस्तान दरम्यान कितीही तणाव असला तरी एका मूक-बधिर तरूणीला तिच्या घरी पाठवत पाकिस्तानने केलेल्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भारत सरकारनेही कराचीतून पळालेल्या १५ वर्षीय मोहम्मद रमझानला त्याच्या आईकडे परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
रमझान १० वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला बांग्लादेशला घेऊन गेले आणि त्याची आईशी ताटातूट झाली. वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर रमजानची सावत्र आई त्याचा छळ करू लागली, या परिस्थितीला कंटाळून पाकिस्तानला आईकडे परत जाण्यासाठी रमझानने २०११ साली बांग्लादेशमधून पळ काढला आणि चुकून सीमा ओलांडून भारतात आला. अनेक राज्यात भटकलेल्या रमझानची २०१३ साली भोपाळ रेल्वे स्थानकावर एका रेल्वे पोलिस अधिका-याने चौकशी केली आणि अखेर त्याला 'चाईल्डलाइन' या संस्थेत पाठवले. तेव्हापासून तो तेथेच आहे.
चाइल्डलाइन संस्थेच्या अध्यक्ष अर्चना सहाय्य यांनी रमझानशी बोलून, त्याची माहिती काढून त्याला पाकिस्तानात परत पाठवण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो पाकिस्तानी नागरिक असल्याचा एकही पुरावा नसल्याने त्याची फाईल बंद झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितले होते आणि त्यामुळेच आता रमझानला कधीच पाकिस्तानला जाऊन आपल्या आईची भेट घेता येणार नाही, असे आम्हाला वाटले होते, असे सहाय म्हणाल्या.
पण यावर्षी सप्टेंबर महिन्यात भोपाळमध्ये सी.ए च्या विद्यार्थ्याने सोशल मीडियावर रमझानचे फोटो टाकत कराचीतील त्याच्या कुटुंबियांचा शोध घेतला. आपला मुलगा भारतात असल्याचे समजल्यानंतर रमझानची आई रझिया बेगम यांनी पाकिस्तानातील मानव अधिकार कार्यकर्ते अन्सर बर्नी यांची भेट घेऊन रमझानची भारतातून सुटका करून पाकिस्तान परत पाठवण्याची विनंती केली. याप्रकणी रझिया बेगम यांनी एक व्हिडीओ अपलोड करून भारत सरकारला विनंती होती. त्यानंतर बर्नी यांनी रमझानच्या आजी -आजोबांच्या पासपोर्टची एक कॉपी भारतीय दूतावासाकडे पाठवली, पण तरीही रमझानला पाकिस्तानात परत आणण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले.
पण गीताला भारतात परत पाठवण्याच्या पाकिस्तानच्या या कृतीनंतर पंतप्रधान कार्यालयानेही रमझानची फाईल पुन्हा उघड़ली असून भोपाळधील चाईल्डलाईन संस्थेला याविषयी माहिती दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या या कृतीमुळे मी खूपच आनंदी असून आम्हाला रमझानला लवकरात लवकर त्याच्या देशात परत पाठवयाचे आहे, असे अर्चना सहाय यांनी सांगितले. आम्ही याप्रकरणी राष्ट्रपती कार्यालयाल पत्र पाठवले असून रमझान लवकरच पाकिस्तानात परतेल असा विश्वास पंतप्रधान कार्यालयातील अधिका-याने व्यक्त केला.