नवी दिल्ली: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर(Rana Kapoor) यांनी ईडीच्या चौकशीदरम्यान एक खळबळजनक दावा केला आहे. "काँग्रेसच्या नेत्यांनी मला जबरदस्तीने प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याकडील एमएफ हुसेन यांची पेटिंग विकत घेण्यास भाग पाडले, त्या मोबदल्यात मला पद्भभूषण देण्याचे आश्वासन दिले होते," असा धक्कादायक खुलासा कपूर यांनी केला आहे.
राणा कपूर यांनी ईडीला यापूर्वीच ही माहिती दिली होती. मात्र, 2020 मध्ये नोंदवण्यात आलेल्या जबाबाचा काही भाग आता समोर आला आहे. त्यात कपूर म्हणतात की, "काँग्रेसचे दिवंगत नेते आणि तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनीच हा व्यवहार करण्यास भाग पाडले होते. एमएफ हुसैन यांची पेंटिंग खरेदी करण्यास नकार दिल्यास गांधी कुटुंबाशी असलेले त्यांचे संबंध बिघडतील आणि पद्म पुरस्कारही हातातून जाईल, असा इशारा देवरा यांनी दिला होता."
सोनिया गांधींच्या उपचारासाठी पैशांचा वापर
राणा कपूर यांनी दावा केला की, त्यांनी पेंटिंगसाठी 2 कोटी रुपयांचा धनादेश दिला होता. तसेच, मिलिंद देवरा (मुरली देवरा यांचा मुलगा) यांनी त्यांना गुप्तपणे माहिती दिली की, या पेंटिंगच्या विक्रीतून मिळणारी रक्कम गांधी परिवार सोनिया गांधी यांच्या न्यूयॉर्कमधील उपचारांसाठी वापरणार आहेत. तसेच, पेटिंग विकत घेतल्यानंतर काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी मला फोन केला होता आणि पेटिंग विकत घेतल्याबद्दल आभारही मानले होते. तसेच आगामी काळात देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी तुमचा विचार करू, असेही पटेल यांनी राणा कपूर यांना सांगितले होते, अशी माहितीही कपूर यांनी दिली. ईडीने शनिवारी राणा कपूर यांच्याविरोधात मुंबईतील पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये राणा कपूर यांच्या या जबाबाचा उल्लेख आहे.