लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अभिनेता आमिर खान याचा सुपरहिट चित्रपट ‘थ्री इडियट्स’मध्ये एक शाळा दाखविण्यात आली हाेती. लडाखमध्ये असलेली ही शाळा त्यानंतर बरीच चर्चेत आली हाेती. या शाळेला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न हाेण्यासाठी तब्बल दाेन दशकांची प्रतीक्षा करावी लागली आहे.
राज्य शिक्षण मंडळाने अलीकडेच ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर आता सीबीएसईची संलग्नता मिळण्याचा मार्ग माेकळा झाला आहे.लडाखमध्ये प्रसिद्ध ड्रक पद्म कार्पाे शाळा आहे. ‘रॅन्चाे’ची शाळा अशी नवी ओळख शाळेला ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाने दिली. शाळेला जम्मू आणि काश्मीर शिक्षण मंडळाची मान्यता आहे. सीबीएसईची मान्यता मिळविण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी अर्ज केला हाेता. मात्र, त्यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या ना हरकत प्रमाणपत्राची महत्त्वाची अट आहे. यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक मिंगूर आग्माे यांनी सांगितले.