रांची : घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना रांची हायकोर्टाने दणका दिला आहे. सध्या जामिनावर बाहेर असणा-या लालू प्रसाद यादव यांनी तब्येतीचे कारण देत जामीन वाढविण्याची याचिका हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांना 30 ऑगस्टपर्यंत पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.
चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले लालू प्रसाद यादव यांना रांची येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांची तब्येत बिघडल्यामुळे सुरुवातीला दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्युटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांचे वकील प्रभात कुमार यांनी सांगितले की, लालू प्रसाद यादव यांच्यावर पुढील उपचार रांचीमधील राजेंद्र इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समध्ये करण्यात येणार आहेत.