नवी दिल्ली : चारा घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या डॉक्टरांनी लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीविषयी मोठे विधान केले आहे. लालू प्रसाद यादव यांची तब्येत कधीही बिघडू शकते, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
लालू प्रसाद यादव यांच्यावर डॉ. उमेश प्रसाद हे उपचार करत आहेत. लालू प्रसाद यादव किडनी काम करणे कधीही थांबवू शकते. त्याचा अंदाज करणे कठीण आहे. लालू यादव यांची किडनी फक्त २५ टक्केच काम करत आहे, असे डॉ. उमेश प्रसाद यांनी म्हटले आहे. तसेच, यासंदर्भात उच्च अधिकाऱ्यांना लेखी स्वरुपात कळविले आहे असून लालू प्रसाद यादव यांची प्रकृती नाजूक बनली आहे, असेही डॉक्टर उमेश प्रसाद यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांना गेल्या महिन्यात राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या खासगी वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. बिहार निवडणूक निकालानंतर लालू प्रसाद यादव हे भाजपा आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणी एक ऑडिओही समोर आला होता, असा आरोप भाजपाने केला होता. मात्र, आरजेडीने हे आरोप फेटाळून लावले.
सुशील कुमार मोदींनी केला होता आरोप बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांच्या आरोपानंतर बिहारचे राजकारण ढवळून निघाले. सुशील कुमार मोदी यांनी आरोप केला होता की, लालू प्रसाद यादव हे रांचीमधील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या बंगल्यातूनच NDAच्या आमदारांना प्रलोभन देत होते आणि नितीश कुमारांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. भाजपाने लालूंचा आणि आमदार ललन पासवान यांच्या संवादाचा ऑडिओदेखील जारी केला होता.
सहा आठवड्यांनंतर सुनावणीलालू प्रसाद यादव यांना तुरुंगातून बाहेर येण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे. झारखंड हायकोर्टात चारा घोटाळा प्रकरणी सुनावणी झाली. यात लालूंच्या वकिलांनी न्यायालयाकडून ६ आठवड्यांची मुदत मागितली आहे. कोर्टाने त्यांना मंजुरी दिली आहे. म्हणजेच लालू यादव यांच्या जामिनावर आता ६ आठवड्यांनंतरच सुनावणी होईल.