तुमच्यातील कला कधीच लपून राहत नाही. जर तुमच्या क्षमता असेल तर समोर आलेल्या संकटावर नक्कीच मात करता येते. रांची येथील एका इयत्ता ८ वी उत्तीर्ण व्यक्तीनंही आपल्यातील कौशल्याला प्रोत्साहन देत इंजिनिअरिंगचा अप्रतिम नमुना सादर केला आहे. (ranchi troubled by rising petrol prices ranchi man made electronic cycle)
रांचीच्या हरमू बाजार परिसरात कालपर्यंत शिरिष बेक यांना कुणी ओळखतही नव्हतं. पण ५२ वर्षीय आदिवासी समाजातील शिरिष यांची सध्या संपूर्ण देशात चर्चा आहे. गेल्या दीड वर्षांपासूनच्या शिरिष यांच्या मेहनतीला अखेर यश आलं आहे. त्यांनी उपलब्ध संसाधनांच्या मदतीनं एक जबरदस्त इलेक्ट्रीक सायकल तयार केली आहे.
महत्वाची बाब म्हणजे शिरिष यांनी तयार केलेली इलेक्ट्रिक सायकल काही सामान्य सायकल नसून ती एका मोटारसायकलला देखील स्वस्त आणि मस्त पर्याय ठरू शकते अशी आहे. बॅटरीवर चालणाऱ्या शिरिष यांची इलेक्ट्रिक सायकल पूर्णपणे चार्ज झाल्यावर जवळपास ३५ ते ४० किलोमीटरपर्यंत चालू शकते.
खरंतर इलेक्ट्रिक सायकल तयार करण्यामागे पेट्रोलच्या वाढत्या किमती हेच मुख्य कारण आहे. यासोबतच मोटारसायकलनं प्रवास करताना सिग्लन मोडल्यास कारवाईला सामोरं जावं लागायचं. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या हे परवडणारं नाही याची जाणीव शिरिष यांना झाली आणि याच प्रेरणेतून त्यांनी इलेक्ट्रिक सायकल तयार करण्याचं काम सुरू केलं.
नेमकी कशी आहे इलेक्ट्रिक सायकल?शिरिष यांच्या इलेक्ट्रिक सायकलमध्ये सर्वसामान्य सायकलप्रमाणे दोन्ही हँडलला ब्रेक देण्यात आले आहेत. पण यात मोटारसायकलसारखाच एक्सीलेटरचा वापर करण्यात आला आहे. सायकलच्या मागच्या चाकावर मोटर लावण्यात आली आहे. तर पुढच्या भागावर एक मोठी बॅटरी बसविण्यात आली आहे. एकंदर या इलेक्ट्रिक सायकलवर बसल्यानंतर मोटारसायकल चालवताना जी काळजी बाळगावी लागते. त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिक सायकल चालवावी लागणार आहे.
शिरिष सध्या आपल्या खास सायकलच्या चार्जिंग यंत्रणेत आणखी सुधार करण्यासाठीचे प्रयत्न करत आहेत. जेणेकरुन सायकल चालवत असतानाच ती चार्ज होईल अशी सुविधा त्यांना उपलब्ध करुन द्यायची आहे. अवघ्या २० हजारांच्या खर्चात शिरिष यांनी इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे.