विनेश फोगटला महिलांच्या ५० किलो कुस्ती स्पर्धेच्या ऑलिम्पिक फायनलपूर्वी अपात्र ठरवण्यात आलं आहे. वजनी गटाच्या मर्यादेपेक्षा अधिक वजन असल्याने विनेशला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलं आहे. या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगट बेशुद्ध झाल्याने तिला पॅरिसमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
विनेश फोगट अपात्र झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी देखील यावरून हल्लाबोल केला आहे. रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "१४० कोटी भारतीयांना धक्का बसला आहे, हा क्रीडा इतिहासातील "काळा दिवस" आहे. हे एक मोठं “द्वेषी षडयंत्र” आहे, आधी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि नंतर मोदीजींचे आवडते भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी देशाच्या विश्वविजेत्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला, त्यानंतर भाजपच्या सदस्यांनी देशाला त्रास देण्यास सुरुवात केली."
"मोदी सरकारने या मुलीवर एफआयआर नोंदवला. विनेश फोगटने धैर्य, शौर्य आणि संयम कधीही गमावला नाही, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जगातील अजिंक्य कुस्तीपटू युई सुसाकी आणि इतर दोन चॅम्पियन कुस्तीपटूंना पराभूत केलं आणि देशाचा तिरंगा फडकवला, परंतु षडयंत्र करणाऱ्यांना हे देखील आवडलं नाही. विनेश फोगटचा विजय कोण पचवू शकलं नाही?, हरियाणाच्या आणि देशाच्या मुलीच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला? सत्तेचा दुरुपयोग कोणी केला? कोणाचा चेहरा वाचवण्याचा प्रयत्न झाला?" असे सवाल देखील विचारले आहेत.
"...पण हे जाणून घ्या की हरियाणा आणि देशातील प्रत्येक जण तिच्यासोबत आहे, आमच्यासाठी ती ऑलिम्पिक गोल्ड मेडल विनर आहे. षडयंत्राचा नक्कीच पर्दाफाश होईल. चेहरे उघड होतील. विनेश, देश म्हणतोय...तू खूप लढली आहेस, भारताची कन्या आहेस" असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. विनेशने ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनून इतिहास रचला होता.