रणदीप सुरजेवाला बंगळुरुत घर का शोधताहेत? काय आहे काँग्रेसचा प्लान, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 01:38 PM2022-05-13T13:38:39+5:302022-05-13T14:54:11+5:30
कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. यात काँग्रेसनं आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली-
कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. यात काँग्रेसनं आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. पक्ष २०२३ सालच्या निवडणूक रणसंग्रामात जोशात उतरणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे कर्नाटकचे प्रभारी आणि महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी कर्नाटकात आता दर महिन्यातील १० ते १५ दिवस राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बंगळुरूत ते वास्तव्याला येण्याची शक्यता आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमेटीच्या (केपीसीसी) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरजेवाला क्विन्स रोड येथे पक्ष कार्यालयाजवळच एखादं भाड्यानं घर शोधत आहेत.
सुरजेवाला यांना २०२० साली कर्नाटक प्रभारी महासचिवपदी नियुक्त केलं गेलं. ते पक्षाच्या मीडिया विंगचे देखील प्रमुख आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार सुरजेवाला सध्या बंगळुरूत घराच्या शोधात आहेत आणि त्यांना माऊंट कॉर्मेलजवळील एक फ्लॅट देखील पसंतीस उतरला आहे. सध्या सुरजेवाला राजस्थानमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात व्यग्र आहेत. या बैठकीनंतर ते थेट बंगळुरुत येऊन संबंधित फ्लॅटचा ताबा घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी निवडलेला फ्लॅट चांगलाच मोठा असून यात बैठक घेण्यासाठी चांगली जागा देखील आहे.
दुसरीकडे काँग्रेस २०२३ च्या निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा वर्षाच्या अखेरीस करण्याची शक्यता आहे. हायकमांडनं सुजरेवाला यांना कर्नाटवर जातीनं लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये जाऊन उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया यातून सोपी होईल. सुरजेवाला कर्नाटक निवडणुकीआधी महिन्याचे १० ते १५ दिवस राज्यात असणार आहेत. याआधी सुरजेवाला ज्या ज्या वेळी बंगळुरूत येत असत त्यावेळी ते हॉटेल कुमार कृपा हेस्ट हाऊसमध्ये थांबत असत.