झोपडीतला तरुण ‘आयआयएम’चा प्राध्यापक!, केरळातील मराठी आदिवासी युवकाची गरुडझेप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 04:40 AM2021-04-12T04:40:16+5:302021-04-12T07:03:36+5:30
‘IIM’ professor : मराठी भाषक अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामचंद्रन यांची भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), रांची येथे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे.
नवी दिल्ली : शिक्षण माणसाचे आयुष्य बदलून टाकत असते. त्याला रंकाचा रावही करते शिक्षण. अनेकांनी आपल्या शिक्षणाच्या बळावर आपल्या आयुष्याचे चित्र बदलवून टाकल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला सापडत असतात. असेच एक उदाहरण आहे रणजीत रामचंद्रन (वय २८) यांचे. ते केरळमधील कासारगोड येथे राहतात. मराठी भाषक अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामचंद्रन यांची भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), रांची येथे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे.
घरात अत्यंत हलाखीची परिस्थिती. वडिलांचा कपडे शिवण्याचा व्यवसाय तर आई रोजगार हमी योजनेवर काम करणारी. भावंडांमध्ये रणजीत सर्वात मोठे. सर्व कुटुंब एका लहानशा झोपडीत राहत होते. अशा परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची आस सोडली नाही. भावंडांच्या शिक्षणासाठी त्यांनी बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंजमध्ये नाइट गार्डची नोकरी केली. नंतर ते आयआयटी मद्रासला गेले. कासारगोडच्या बाहेर कधीही न गेलेल्या माझ्यासारख्याला इंग्रजीही धड बोलता येत नव्हते. परंतु परिस्थितीने सर्व शिकवले, असे रणजीत विनयाने नमूद करतात. रणजीत यांनी अर्थशास्त्रात पीएच.डी. पूर्ण केले असून गेल्या सोमवारी त्यांची आयआयएम, रांची येथे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. तत्पूर्वी ते बंगळुरू येथील एका विद्यापीठात कार्यरत होते.
यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या तरुणांना माझ्यामुळे कदाचित प्रेरणा मिळू शकेल. एका क्षणी तर पुढील शिक्षण सोडून कुटुंबासाठी नोकरी करण्याचे मी ठरविले होते. परंतु परिस्थिती बदलवली, याचे समाधान वाटते.
- रणजीत रामचंद्रन