Ranveer Allahbadia Supreme Court : प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादिया याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' शो प्रकरणावर आज (3 मार्च 2025) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी रणवीरला न्यायालयाकडून शो करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण, यासोबतच त्याच्यावर काही अटीही घालण्यात आल्या आहेत.
युट्यूबर्स रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत आहे. आजच्या सुनावणीत रणवीर अलाहाबादियाच्या वकिलाच्या विनंतीवरुन, कोर्टाने त्याच्या शो वरील बंदी उठवली आहे, परंतु सर्व वयोगटांना पाहण्यासाठी योग्य कंटेट बवण्याची अटही घातली आहे. याशिवाय, न्यायालयाने केंद्र सरकारला अश्लील कंटेटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना देण्यास सांगितले आहे.
रणवीर अलाहाबादियाची बाजू मांडणारे अधिवक्ता अभिनव चंद्रचूड न्यायाधीशांना म्हणाले, तुम्ही रणवीरच्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे, परंतु 280 लोक त्याच्याशी जोडले गेले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न आहे. अशा प्रकारच्या कॉमेडी शोशिवाय तो अनेक कार्यक्रम करतो. इतर कार्यक्रम करण्याची परवानगी मिळावी. यायवर न्यायाधीशांनी परवानगी दिली खरी, पण योग्य कंटेट बनवावा, अशी अटही घातली आहे.
रणवीर अलाहाबादियाने परदेशात जाऊन कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची परवानगीही मागितली होती, त्यावर न्यायालयाने त्याला आधी तपासात सहभागी होण्यास सांगितले आहे. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या विनंतीचा विचार केला जाईल. याशिवाय, या खटल्याला प्रभावित करणारा कोणताही कंटेट प्रसारित करू नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी समय रैनाने न्यायालयीन कामकाजाची खिल्ली उडवणारी टिप्पणी केल्याचा उल्लेख करत नाराजी व्यक्त केली. त्यावर न्यायाधीश म्हणाले, आमच्या पिढीला काही कळत नाही, असा विचार तरुणांनी करू नये. गरजेनुसार योग्य ती कारवाई केली जाईल.