नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा विषय तापला असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. "शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही", असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. यावरून अनेकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दानवे यांच्या या विधानाचा दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट समितीने (DSGMC) निषेध केला आहे.
रावसाहेब दानवेंचं हे विधान अपमानजनक असल्याचं शीख संस्थेनं म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांचा विरोध करण्यासाठी त्यांना राष्ट्रद्रोही आणि अराजक असल्याचं देखील म्हटलं जात असल्याचं शीख संस्थेने म्हटलं आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट समितीचे अध्यक्ष एस. मजिंदरसिंह सिरसा यांनी बुधवारी एक व्हिडिओ संदेश जारी केला. यामध्ये त्यांनी "शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. सरकार मात्र न्याय देण्यात असमर्थ आहे. जे शेतकरी स्वत: देशासाठी लढत आपला जीव अर्पण करतात, अन्नधान्य पिकवतात, ज्यांची मुलेही देशासाठी शहीद होतात, त्यांना देशद्रोही दाखण्याचा प्रयत्न करू नका" असं म्हटलं आहे.
शेतकरी आंदोनलामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचा अजब दावा
रावसाहेब दानवे यांच्या विधानामुळे शेतकरी आंदोलनावरुन आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. "आता जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये मुस्लिम समाजाला उचवलं गेलं आणि सीएए, एनआरसीमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल असं सांगितलं गेलं. पण एखादा तरी मुस्लिम नागरिक बाहेर गेला का?", असं रावसाहेब दानवे म्हणाले. जालना जिल्ह्यात एका आरोग्य केंद्राच्या उदघाटनावेळी ते बोलत होते. दिल्लीत सुरू असलेले आंदोलन सुटाबुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असेही दानवे म्हणाले.
दानवेंनी पुरावे द्यावेत, केंद्राने सर्जिकल स्ट्राईक करावा; संजय राऊतांचा टोला
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. जर केंद्रीय मंत्र्याला शेतकरी आंदोलनामागे चीन, पाकिस्तानचा हात असल्याचा सुगावा लागला आहे, त्यांनी संरक्षण मंत्र्यांना तातडीने याची माहिती द्यायला हवी. तसेच चीन आणि पाकवर लगेचच सर्जिकल स्ट्राईक करावा. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि सैन्यदलाच्या प्रमुखांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा, असा टोला लगावला आहे.