नवी दिल्ली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार ताशेरे ओढले. यावेळी विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य करत शिवसेनेवरही जोरदार निशाणा साधला. यानंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला. यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी या युतींच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चा झाली. दोन्ही नेत्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र भाजप-मनसे युतीबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक कयास लगावले जात आहेत. यातच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही यावर प्रतिक्रिया देत भाजप-मनसे युतीबाबत भाष्य केले आहे. ते मीडियाशी बोलत होते.
तोपर्यंत भाजप-मनसे युती शक्य नाही
राज ठाकरे जोपर्यंत परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नाही. आधी केवळ आम्हालाच वाटत होतं की शिवसेनेने हिंदुत्व सोडले, पण राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाचा अंदाज घेतला तर आता घरातूनच आवाज उठायला लागला आहे. राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने चालले आहेत. माझी आणि राज ठाकरे यांची लवकरच भेट होणार आहे. पण ती वेगळ्या विषयावर होणार असून ही भेट राजकीय असणार नाही, असे दानवे यांनी नमूद केले.
दरम्यान, ईडी, सीबीआय या स्वायत्त संस्था आहेत. तक्रार आल्यावरच त्या कारवाई करतात. त्यामुळे तक्रार असेल तर कोणाचीही कारवाई होऊ शकते, त्यात घाबरण्याचे कारण काय, अशी विचारणाही दानवे यांनी यावेळी केली. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच युपीए अध्यक्षपदाबाबत रस नसल्याचे म्हटले असून, यावर बोलताना, यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पण यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीनेच ठराव केला आहे, असा सवाल दानवे यांनी केला.