कोलकाता - शहरातील एका सरकारी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील प्रशिक्षित महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर मोठी खळबळ माजली आहे. या मृत महिलेच्या शरीरावर गंभीर खूणा आहेत त्यातून हत्येआधी तिच्यावर अत्याचार झाल्याचं दिसून येते. पोलिसांनी या प्रकरणात बलात्कार आणि हत्या गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. मात्र या घटनेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ही घटना दुर्दैवी आणि घृणास्पद आहे. सहकारी डॉक्टरांचा राग योग्य आहे. मी पीडितेच्या कुटुंबाशी संवाद साधला. या घटनेतील दोषींवर योग्य ती कारवाई करू. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देश दिले आहेत. जर आवश्यकता असेल तर आरोपींना फाशीची शिक्षा देऊ, पण मी फाशीच्या शिक्षेचं समर्थन करत नाही असं त्यांनी सांगितले.
तर प्रशिक्षित महिला डॉक्टरच्या रेप आणि हत्येप्रकरणी विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते सुवेंद्रु अधिकारी यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री बॅनर्जींनी मला सीबीआय चौकशीवर आक्षेप नाही असं उत्तर दिलं. ३१ वर्षीय महिला डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्ट्स, चेहरा, होठ, गळा, पोट यावर गंभीर खूणा आहेत. मेडिकलच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या या महिला विद्यार्थी गुरुवारी रात्री जेवण करून आरजी मेडिकलच्या तिसऱ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये अभ्यास करायला गेली होती. त्याठिकाणी सकाळी ती बेशुद्ध अवस्थेत आढळली.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील आरजी मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेवरून फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी नड्डा यांना पत्र लिहिलं आहे. जर २४ तासांत दोषींवर कारवाई झाली नाही तर आम्ही काम बंद आंदोलन करू असा इशारा संघटनेने दिला आहे.
नेमकी घटना काय?
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका ट्रेनी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यूनं अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले. या महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्याचा केल्याचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका व्यक्तीला अटक केली. हा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कर्मचारी आहे. कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.