नवी दिल्ली : बलात्कार झाला आहे की नाही याची निश्चिती करणारे पाच हजार किट केंद्रीय गृह विभागाने खरेदी केले असून ते देशातील निवडक पोलीस ठाण्यांना देण्यात येणार आहेत. बलात्कार प्रकरणांचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.निवडक पोलीस ठाण्यांना प्रत्येकी पाच किट देण्यात येतील. बलात्कार पीडितेची तातडीने वैद्यकीय तपासणी करून, त्याद्वारे भक्कम पुरावे गोळा करणे या किटद्वारे शक्य होईल. या प्रत्येक किटची किंमत २०० ते ३०० रुपये आहे. काही टेस्ट ट्यूब व बॉटल्स या किटमध्ये समावेश आहे. हीे किट्स राज्यांनीही विकत घेऊन पोलिसांना द्यावीत, असे आवाहन केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी केले होते. देशात १३ हजार बलात्कार प्रकरणांमध्ये फॉरेन्सिक तपासणीच झाली नव्हती. इतक्या तपासण्या करण्याची क्षमता व संसाधने प्रयोगशाळांकडे नाही अशी माहिती मनेका गांधी यांनी दिली होती. देशात १५०० फॉरेन्सिक तज्ज्ञ आहेत.
पोलीस ठाण्यांना देणार बलात्कार निश्चिती किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:41 PM