लखनौ : बलात्काराचा आरोप असलेले गायत्री प्रजापती यांना मंत्रिमंडळात ठेवणे समर्थनीय आहे का, याचा खुलासा करा, असे पत्र राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना रविवारी पाठवले आहे. प्रजापती यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर अजामीनपात्र अटक वॉरंट जारी झालेले आहे. प्रजापती हे मंत्रिमंडळात या पार्श्वभूमीवरही आहेत यामुळे घटनात्मक नैतिकता आणि प्रतिष्ठेचा प्रश्न उपस्थित झाला आहे, असे नाईक यांनी या पत्रात म्हटले. प्रसारमाध्यमांत आलेल्या बातम्यांनुसार प्रजापती यांच्यावर लक्ष ठेवा अशी नोटीस जारी झाली आहे कारण ते देशाबाहेर पळून जाऊ शकतात. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे, असे नाईक यांनी पत्रात म्हटले. प्रजापती हे कॅबिनेट मंत्री असल्यामुळे हे सगळे प्रकरणच गंभीर असल्याचे नाईक त्यात म्हणाले. अखिलेश यादव यांनी स्वत: प्रजापती यांना शरण येण्यास सांगूनही ते आलेले नाहीत व फरार आहेत. ते विदेशात गेले असण्याची शक्यता असल्याचे नाईक यांनी म्हटले. पोलिस प्रजापती यांना अटक करण्याच्या प्रयत्नांत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी समाजवादी पक्ष-काँग्रेस ‘गायत्री प्रजापती मंत्र’ जपत असल्याचा आरोप केल्यानंतर प्रजापती यांचा पासपोर्ट जप्त केला गेला व लूक आऊट नोटीस जारी केली गेली. सामुहिक बलात्कार आणि महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्याचा गुन्हा प्रजापती यांच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल केला आहे.>भाजपा सत्तेवर येताच प्रजापती तुरुंगात : शाहगायत्री प्रजापती यांना अटक करण्यात अपयश आलेल्या उत्तर प्रदेश सरकारवर भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी येथे जोरदार टीका केली. राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होताच प्रजापती यांना तुरुंगात घालण्याचे काम सगळ््यात आधी केले जाईल, असे शाह म्हणाले. ते निवडणूक प्रचार सभेत बोलत होते.शाह म्हणाले, ‘उत्तर प्रदेशात भाजपाने सरकार स्थापन केले की लगेचच प्रजापतींना आम्ही नरकातूनही शोधून काढून तुरुंगात घालू.’ प्रजापती हे अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळात वाहतूक खात्याचे मंत्री आहेत.बलात्काराचा आरोप असलेले प्रजापती यांनी समाजवादी पक्षासाठी जवळपास सहा दिवस प्रचार केला व २७ फेब्रुवारी रोजी मतदानही केले, असे शाह म्हणाले, परंतु पोलीस काहीही करू शकलेले नाहीत. दुसरीकडे मुख्यमंत्री प्रजापती यांना शरण येण्यास सांगतात. गुन्हेगारांची मान धरून त्यांना तुरुंगात धाडण्याचे पोलिसांचे काम आहे, असे अमित शाह म्हणाले.
बलात्काराचा आरोप, मग मंत्रिपदी कसे?
By admin | Published: March 06, 2017 4:32 AM