जम्मू : कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षे वयाच्या बालिकेवरील बलात्कार हत्याप्रकरणी आरोपींना वाचवण्यासाठी जम्मूमध्ये वकील तसेच अन्य काही संघटना आंदोलने करीत असल्या, तरी झालेला अतिशय घृणास्पद होता आणि त्याचे समर्थन करताच येणार नाही, असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून स्पष्ट झाले आहे.मुस्लीम समाजातील बकरवाल (मेंढ्या व घोडे पाळणारे) या भटक्या जमातीच्या बालिकेचे आठ वर्षे वयाच्या १० जानेवारी रोजी अपहरण करून तिला मंदिरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. गुंगीचे औषध दिल्यानंतर या मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाने जम्मू-काश्मीरमध्ये जातीय तेढ निर्माण झाली आहे, असे या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. मारेक-यांना वाचवण्यासाठी जम्मूमध्ये आंदोलने सुरू आहेत, तर आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने चालू आहेत.ही मुलगी आपल्या घराजवळ घोड्यांना चारा देत असताना तिचे अपहरण करण्यात आले. हे कारस्थान महसूल विभागातील निवृत्त अधिकारी सांजीराम याने रचले होते असे नमूद करून, आरोपपत्रात म्हटले आहे की, रस्साना गावातून बकरवाल जमातीच्या लोकांना हाकलून लावण्यासाठी सांझीराम प्रयत्नशील होता. बकरवालांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्याने हे केले. त्यात त्याने भाच्यालाही सहभागी करून घेतले.पोलिसांनी सांझीराम, त्याचा मुलगा विशाल जांगोरा, भाचा, भाच्याचा मित्र, पोलीस उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल, आणखी दोन पोलीस अधिकारी अशा आठ जणांना अटक केली आहे. तिचे अपहरण केल्यानंतर सांझीरामच्या भाच्याने मीरत येथून विशाल जांगोराला फोन करून वासनापूर्ती करण्यासाठी बोलावून घेतले. बलात्कारानंतर तिची हत्या केल्यानंतर सर्व पुरावे त्यांनी लाचखोर पोलिसांच्या मदतीने नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सांझीरामच्या भाच्याने बालिकेची ठेचून हत्या करून, मृतदेह मंदिराजवळ पुरला. पोलिसांनी मृतदेह १७ जानेवारी रोजी ताब्यात घेतला. >आरोपींना कठोर शासन करणार - मेहबुबा मुफ्तीसामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा होईल. यामध्ये कोणाचाही अडथळा सरकार सहन करणार नाही, असे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले. या बलात्कार प्रकरणी क्राइम ब्रँचला आरोपपत्र दाखल करण्यात सोमवारी वकिलांनी व काही हिंदुत्ववादी संघटनांनी अडथळे उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला.
मंदिरात कोंडून बालिकेवर सामूहिक बलात्कार, मारेकऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 4:07 AM