सुरजपूर - छत्तीसगडचे गृहमंत्री रामसेवक पैकरा यांच्या पुतण्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. शमोध पैकरा असे आरोपीचे नाव असून सूरजपूर जिल्ह्यातील पीडित महिलेने याबाबत तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला फसविल्याचा आरोप शमोध याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच आरोपीकडून मला मूल झाले असून ते अडीच वर्षांचे असल्याचा दावाही पीडितेने केला आहे.
छत्तीसगडचे गृहमंत्री रामसेवक पैकरा यांच्या पुतण्याने शाळेतील मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून फसवले. शमोध पैकराने पीडितेशी जवळीक साधत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिला लग्नाचे आमिषही दाखवले. मात्र, पीडिता गरोदर राहिल्यानंतर शमोधने तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी पीडितेने गर्भपात करण्यास नकार देत बाळाला जन्म दिला. याप्रकरणी पोलिसांनी शमोधविरुद्ध 1 वर्षापूर्वीच तक्रार दाखल करुन घेतली होती. पण, तीन दिवसांपूर्वी कलम 376 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. मात्र, आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नसल्याचे सुरजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक्षक गिरीजाशंकर जैस्वाल यांनी सांगितले.