ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याच्या बाबतीत देशाच्या राजधानीची स्थिती चिंताजनक असून धक्कादायक बाब म्हणजे बलात्कारांच्या एकूण घटनांमधील ४८ टक्के पिडीत या अल्पवयीन मुली आहेत. दर दोन दिवसांमध्ये दिल्लीत पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार होत असल्याची माहिती आज राज्यसभेत देण्यात आली.
२०१३ मध्ये राजधानीत १,६३६ बलात्काराचे गुन्हे नोंदवण्यात आले, यामध्ये ७५७ पिडीत अल्पवयीन होत्या. २०१४मध्ये बलात्काराच्या २,१६६ घटना घडल्या ज्यामध्ये अल्पवयीन पिडीतांचे प्रमाण १००४ एवढे होते. तर या वर्षी ऑक्टोबरपर्यंत बलात्काराचे १,८५६ गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यापैकी ८२४ बलात्कार अल्पवयीन मुलींवर झालेले आहेत.
बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत हलगर्जीपणा न करता, प्रत्येक तक्रार दाखल करून घेण्याच्या सूचना दिल्ली पोलीसांना देण्यात आल्या असून कुठल्याही दुर्बल घटकाविरोधातला प्रत्येक गुन्हा नोंदला गेलाच पाहिजे अशी काळजी घेण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी राज्यसभेत सांगितले आहे.