नवी दिल्ली:बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी आज पत्रकार परिषदेतून नितीश कुमारांवर जोरदार हल्लाबोल केला. 'नवीन सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या दोन दिवसात राज्यात अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर JDU आणि RJD यांच्यात नेमकं काय सुरू आहे, हे तुम्हाला सांगतो.'
ते पुढे म्हमाले, '10 ऑगस्ट रोजी बिहारमध्ये एका पत्रकाराची गोळी मारुन हत्या करण्यात आली. 11 ऑगस्टला अजून एका पत्रकाराची हत्या झाली आणि बेतियामधील एका पुजाऱ्याचा गळा चिरण्यात आला. याशिवाय, 11 ऑगस्ट रोजी पाटण्यातील एक कार शोरुममध्ये मोठी चोरी आणि छपरामध्ये विषारी दारू प्यायलायने 6 जणांचा मृत्यू झाला. छपरात यापूर्वी 13 जणांचा दारुमुळे मृत्यू झाला होता. याशिवाय, नितीश कुमारांच्या नालंदामध्येही 10 जणांचा मृत्यू झाला,' असा अनेक घटनांचा पाढाच संबित पात्रा यांनी वाचला.
पुढे पात्रा म्हणतात की, 'बिहारमध्ये गुन्ह्यांनी मर्यादा ओलांडली आहे. पश्चिम चंपारण जिल्ह्यात एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, मुझफ्फरपूरमध्ये एका व्यावसायिकाचे घर भरदिवसा लुटले गेले, दागिन्यांच्या दुकानात चोरीच्या घटना घडल्या. छेडछाड, खून, बलात्कार, दरोडे यांचा नंगा नाच बिहारमध्ये सुरू आहे. बिहारमध्ये पुन्हा जंगलराज आले आहे,' असा घणाघात पात्रा यांनी केला.