मथुरा: आज काल बलात्कारांच्या बातम्यांना जास्त प्रसिद्धी दिली जात आहे, असं भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांना म्हटलं आहे. 'आधीही बलात्कार होत असतील. माहित नाही. मात्र आता त्याबद्दलच्या घटनांना जास्त प्रसिद्धी मिळत आहे,' असं मथुरा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार असलेल्या हेमा मालिनी म्हणाल्या. 'बलात्कारासारख्या घटना देशात घडायला नकोत. त्यामुळे देशाची प्रतिमा डागाळते,' असं हेमा मालिनी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हटलं. कथुआ आणि उन्नव बलात्कार प्रकरणांमुळे देशातलं वातावरण सध्या ढवळून निघालं आहे. या प्रकरणांमधील दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी सर्वच स्तरांमधून करण्यात येतं आहे. कथुआ आणि उन्नवसारख्या घटना देशातील इतर भागांमध्येही घडत असल्यानं याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. कथुआ प्रकरणात आठ वर्षांच्या मुलीवर अतिशय पाशवी अत्याचार करण्यात आले होते. यानंतर पीडित मुलीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा मागणी करण्याच्या मागणीनं जोर धरला. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळानं आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी केंद्र सरकारनं पॉक्सो कायद्यात बदल केला आहे.
'बलात्कारांच्या बातम्यांना जास्त प्रसिद्धी दिली जातेय'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 3:27 PM