लखनौ : भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांनी बलात्कार केला होता, असे चौकशीतून आढळून आले असून, पोलिसांनी जाणूनबुजून एफआयआरमध्ये सेंगर व अन्य आरोपींची नावे घातली नव्हती आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यास मुद्दामच विलंब केला, असे सीबीआयने म्हटले आहे. यामुळे सेंगरच्या अडचणी वाढल्या आहेत.सेंगर याने गेल्या जूनमध्ये मुलीवर बलात्कार केला होता. बलात्कार होत असताना सेंगरची महिला सहकारी बंद खोलीबाहेर पहारा देत होती. तिलाही अटक झाली आहे. पीडित तरुणीने वारंवार तक्रार नोंदवण्याचा आग्रह धरला, मात्र पोलिसांनी , २0 जून रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र एफआयआरमध्ये सेंगर व इतर आरोपींचा उल्लेख करण्याचे टाळले.सीबीआयने सदर पीडित तरुणीचा न्यायालयासमोर जबाब नोंदवून घेतला आहे. तिचे कपडेही फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले नाहीत. तक्रार नोंदवण्यास व तपास सुरू करण्यास उशीर केला.तक्रार करूनही या प्रकरणाचा तपास पोलीस करीत नसल्याने पीडित तरुणी व तिच्या कुटुंबीयांनी ८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाची खूपच ओरड झाल्याने एप्रिलमध्ये सेंगर व अन्य आरोपींना अटक करण्यात आली. तसेच राज्य सरकारने हे प्रकरणा तपासासाठी सीबीआयकडे सोपवले.पोलिसांनी तरुणीचे वडील पप्पू सिंग यांनाच अटक केली. अटकेच्या दुसऱ्याच दिवशी ते पोलीस कोठडीत मरण पावले. आमदाराचा भाऊ व त्याच्या चार साथीदारांनी पप्पू सिंग यांना पोलीस कोठडीत मारहाण केली होती आणि त्यामुळेच ते मरण पावले, असेही तपासात निष्पन्न झाले आहे.आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून सेंगरला बलात्काराच्या आरोपातून सोडवण्यासाठी त्याच्या पत्नीकडे १ कोटी रुपये मागणाºया दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सेंगरच्या पत्नीने या प्रकाराची तक्रार केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यापैकी एकाने आपण भाजपाचा नेता असून, आपण सीबीआय अधिकाºयाच्या मदतीने तुमच्या पतीला सोडवू, असे सांगितले. भाजपा नेता म्हणवून घेणारा इसम सुशिक्षित असून, नोकरी मिळत नसल्याने त्याने हा उद्योग केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.
आमदार सेंगरनेच केला बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 3:28 AM