अहमदाबाद : सुरत शहरात आॅक्टोबर २०१८ मध्ये तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या खटल्यात दोषी ठरलेल्या अनिल यादव (२२) याला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी कायम ठेवली.
लहान मुलांच्या लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण देणाऱ्या (पोक्सो) कायद्याच्या सुरतमधील विशेष न्यायालयाने गेल्या जुलै महिन्यात यादव याला फाशीची शिक्षा सुनावली होती. ती मुलगी १४ आॅक्टोबर २०१८ रोजी सुरतच्या गोडादारा भागातील तिच्या घरून बेपत्ता झाली होती. ती ज्या इमारतीत राहत होती तिच्या तळमजल्यावरील बंद असलेल्या खोलीत तिचा मृतदेह पोलिसांना एक दिवसानंतर मिळाला. ही खोली यादवची होती व तो बेपत्ता होता. यादव बिहारमधून आलेला स्थलांतरित मजूर होता. यादवला मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पाच दिवसांनी अटक करण्यात आली होती.